खलिस्तान समर्थक हरदीप सिंग निज्जर याच्या हत्या प्रकरणात भारताचा सहभाग असल्याचा आरोप कॅनडानं केला आहे. या आरोपांवरून दोन्ही देशांमधले संबंध ताणले गेले आहेत. एकीकडे अमेरिका, ऑस्ट्रेलियानं कॅनडाची बाजू घेतलेली असताना दुसरीकडे जी २० परिषदेतच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कॅनडाच्या आरोपांबाबच माहिती दिली होती, असा दावा आता करण्यात येत आहे. रॉयटर्स या वृत्तसंस्थेनं फायनान्शियल टाईम्सच्या हवाल्याने हे वृत्त दिलं आहे. त्यामुळे आता या दाव्यावरून जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
आय फाईव्ह सदस्यराष्ट्रांचा कॅनडाला पाठिंबा!
कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी देशाच्या संसदेसमोर बोलताना भारत सरकारचा या हत्या प्रकरणात सहभाग असल्याचा गंभीर आरोप केला आहे. तसेच, भारत सरकारने या प्रकरणाच्या मुळाशी जाण्यासाठी सहकार्य करावं, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे. भारतानं हे आरोप फेटाळले असले, तरी अमेरिका व ऑस्ट्रेलियानं कॅनडाची बाजू घेतली आहे. भारतानं तपासात सहकार्य करायला हवं. कॅनडाचे आरोप गंभीर असून या प्रकरणातलं सत्य जगासमोर यायला हवं, अशी भूमिका आय फाईव्ह आघाडीतील कॅनडाचे मित्र सदस्य असणाऱ्या अमेरिका व ऑस्ट्रेलियानं घेतली आहे.
Video: “कॅनडाच्या संसदेत भारतावर आरोप करण्याचा निर्णय…”, जस्टिन ट्रुडोंनी दिलं स्पष्टीकरण!
जी २० मध्ये खरंच नरेंद्र मोदींशी यावर चर्चा झाली?
जी २० परिषदेसाठी जगभरातील प्रभावी राष्ट्रांचे प्रमुख व प्रतिनिधी दिल्लीत उपस्थित होते. या परिषदेमध्ये परस्पर सहकार्याची ग्वाही दिली गेली. तसेच, युक्रेनच्या मुद्द्यावरही रशियासकट सर्व राष्ट्रांची सहमती घडवून आणली गेली. त्यामुळे ही परिषद सर्वार्थाने यशस्वी ठरल्याचा दावा करण्यात आला आहे. मात्र, कॅनडाच्या पंतप्रधानांनी आरोप करण्याच्याही दहा दिवस आधी या परिषदेत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींशी कॅनडाच्या आरोपांबाबत चर्चा केली होती, असं वृत्त रॉयटर्सनं दिलं आहे.
दरम्यान, यासंदर्भात प्रतिक्रिया देण्यासाठी व्हाईट हाऊसमधील प्रतिनिधी अद्याप उपलब्ध होऊ शकले नसल्याचंही या वृ्त्तात नमूद करण्यात आलं आहे. आय फाईव्ह आघाडीतील आपल्या मित्रराष्ट्रांना कॅनडानंच मोदींशी या मुद्द्यावर चर्चा करण्याची विनंती केली होती, असंही यात म्हटलं आहे. त्यानुसार मोदींशी जी २० परिषदेदरम्यान हरदीप सिंग निज्जरच्या हत्या प्रकरणावर चर्चा झाल्याचं सांगण्यात येत आहे. दरम्यान, या दाव्यावर केंद्र सरकारकडून अद्याप कोणतीही भूमिका स्पष्ट करण्यात आलेली नाही.
कॅनडाच्या पंतप्रधानांचं जी २० परिषदेवेळीच बिनसलं होतं? ‘या’ कृतीमुळे झाली होती भारतीय सुरक्षा यंत्रणेची अडचण!
आत्तापर्यंत काय घडलंय?
कॅनडाने भारत सरकारवर आरोप करताना भारताच्या एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याची आधी हकालपट्टी केली. त्यापाठोपाठ भारतानं परखड शब्दांत कॅनडाचे आरोप फेटाळून लावत कॅनडाच्या दिल्लीतील उच्चपदस्थ अधिकाऱ्याची हकालपट्टी केली. दोन्ही देशांनी आपापल्या नागरिकांना एकमेकांच्या देशात जाताना अधिक काळजी घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. भारतानं कॅनडातील व्हिसा सेवा तात्पुरती स्थगित केली आहे. तर कॅनडानं भारतातील आपला कर्मचारी व अधिकारी वर्ग कमी करायला सुरुवात केली आहे.