तीन आठवडे उलटले असले तरी रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धसंघर्ष अजूनही संपलेला नाही. रशियन फौजा युक्रेनमधील महत्त्वाच्या शहरांवर हवाई हल्ले तसेच गोळीबार करत आहेत. तर दुसरीकडे या दोन्ही देशांतील युद्ध चिघळू नये म्हणून जगभरातील देश प्रयत्न करत आहेत. युद्ध थांबावे म्हणून आर्थिक कोंडी करण्यासाठी अमेरिकेसह अनेक देश रशियावर वेगवेगळे निर्बंध लागू करत आहेत. जागतिक पातळीवर या घडामोडी घडत असताना आता रशियाला पाठिंबा दिला तर गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा अशारा अमेरिकेने चीनला दिला आहे.
द गार्डियनने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्यात फोन कॉलद्वारे दोन तास चर्चा झाली. या चर्चेत रशिया-युक्रेन युद्धासह अन्य विषयावर गंभीर चर्चा करण्यात आली. यावेळी जो बायडेन यांनी चीनने युक्रेनमधील शहरं तसेच नागरिकांवर हल्ला करणाऱ्या रशियाला पाठिंबा दिला तर काय परिणाम भोगावे लागतील याबद्दल माहिती दिली.
अमेरिकेच्या वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्याने दोन नेत्यांमधील या चर्चेबद्दल सांगितले आहे. “रशियाला पाठिंबा देणाऱ्यांना काय परिणाम भोगावे लागतील, याची माहिती बायडेन यांनी शी जिनपिंग यांना दिली. मात्र या चर्चेदरम्यान, युद्ध थांबावण्यााठी शी जिनपिंग यांनी पुतीनशी चर्चा करावी, असं बायडेन म्हणाले नाहीत. बायडेन शी यांना कोणतीही विनंती करत नव्हते. तर ते सध्याची परिस्थिती नेमकी कशी आहे, याबद्दल सांगत होते,” असं या अधिकाऱ्याने सांगितलं आहे.
दरम्यान, जो बायडेन आणि शी जिनपिंग यांच्यातील चर्चाचे वृत्त चायनिज वृत्तसंस्था शिन्हुआने दिले आहे. या वृत्तानुसार, हे युद्ध व्हायला नकोय, अशी इच्छा शी जिनपिंग यांनी व्यक्त केली. मात्र चीनकडून रशियाला पाठिंबा मिळणार की नाही ? याबद्दल शी यांनी कोणतेही भाष्य केले नाही, असं या वृत्तसंस्थेने म्हटलं आहे.