गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना अमेरिकेचा व्हिसा मिळण्यासंबंधी भाजपच्या नेत्यांनी केलेली शिष्टाई असफलच ठरली आहे.
मोदी यांना अमेरिकेचा व्हिसा मिळण्याचा मार्ग निष्कंटक व्हावा म्हणून माजी नोकरशहा व भाजपचे विद्यमान नेते के. जे. अल्फॉन्स यांनी अलीकडेच यासंबंधी अत्यंत वरिष्ठ पातळीवरून प्रयत्न केले, परंतु या मुद्दय़ावरून ठाम आश्वासन मिळण्याकामी अल्फॉन्स यांना यश आले नाही. मात्र, अमेरिका या धोरणात लवकरच बदल करील, अशी आशा अल्फॉन्स यांनी व्यक्त केली. अल्फॉन्स हे भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य आहेत.
अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांच्या समवेत विशेष चर्चा करण्यासाठी अल्फॉन्स ७ फेब्रुवारी रोजी अमेरिकेत आले. त्यानंतर त्यांनी विविध सेनेट सदस्य, वरिष्ठ अधिकारी, शिक्षणतज्ज्ञ आदींच्या भेटी घेतल्या. प्रतिष्ठित म्हणून ओळखल्या जात असलेल्या हार्वर्ड विद्यापीठात त्यांनी भाषणही केले. मोदी हे राष्ट्रीय राजकारणात मोठी भूमिका बजावत असून अमेरिकेच्या अधिकाऱ्यांनी मोदी यांना व्हिसा न देण्याच्या धोरणात बदल केला नाही आणि मोदी यांना अमेरिकेत आमंत्रित केले नाही तर अमेरिकेसाठी तो एक प्रकारचा विलंबच ठरेल, असे आपण संबंधितांना सांगितले असल्याचे अल्फॉन्स यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, अमेरिकेच्या परराष्ट्र खात्याच्या दक्षिण आणि मध्यवर्ती आशियाई विभागाचे सहसचिव रॉबर्ट ब्लेक यांनीही नवी दिल्लीत बोलताना मोदी यांच्यासंबंधी अमेरिकेच्या धोरणात कसलाही बदल झालेला नसल्याचे स्पष्ट केले. मोदी यांच्यासंबंधीची भूमिका बदलण्याचा, या भूमिकेचा पुनर्विचार करण्याचा किंवा ही भूमिका मवाळ करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असे ब्लेक यांनी सांगितले. मोदी यांच्याविरुद्ध सुरू असलेल्या खटल्यांप्रकरणी भारतीय न्यायव्यवस्था कोणती भूमिका घेते, यावर त्यांच्यासंबंधीच्या धोरणात बदल करण्यात येईल, असे ब्लेक म्हणाले.