नवी दिल्ली : अमेरिकेतील औषधनिर्मिती क्षेत्रातील दिग्गज कंपनी एली लिलीने गुरुवारी भारतात वजन कमी करणारे टीर्झेपेटाईड औषध ‘मोनजारो’ सादर केले आहे. हे औषध एकाच डोजच्या स्वरुपात असून आठवड्यातून एकदा स्वत:हून इंजेक्शन देण्यासाठी याची रचना करण्यात आली आहे. भारतात हे औषधाच्या चिठ्ठीवरही उपलब्ध असेल. २.५ मिलीग्रामची किंमत ३,५०० रुपये आणि ५ मिलीग्रामची किंमत ४,३७५ रुपये आहे. निश्चित डोजनुसार रुग्णांना दरमहा किमान १४,००० रुपये खर्च करावे लागतील. औषधाची वैध चिठ्ठी दाखविल्यांनतर नोंदणीकृत औषधालयात ‘मोनजारो’ (टीर्झेपेटाईड) उपलब्ध होईल, असे कंपनीने स्पष्ट केले आहे.
टिर्झेपाटाइड हे इन्क्रिटिन मिमेटिक्स नावाच्या औषधांच्या एका नवीन गटाचा भाग आहे, जे आतड्यांतील नैसर्गिक संप्रेरकांचे कार्य करते. हे संप्रेरक शरीराला तीन प्रकारे इन्सुलिनचे उत्पादन वाढविणे, ग्लुकागॉनचे उत्सर्जन कमी करणे आणि भूक कमी करण्यासाठी पचन मंदावण्यास मदत करते.
डेन्मार्कची दिग्गज औषध निर्मिती कंपनी नोवो नॉर्डिस्कच्या या औषधाने वजन कमी करण्याच्या परिणामांमुळे जागतिक लक्ष वेधून घेतले आहे.
ज्यांचे बीएमआय ३०पेक्षा जास्त आणि २५ ते २९ दरम्यान आहे तसेच वजन जास्त आहे आणि मधुमेह आणि हृदयरोग यांसारखे वजनाशी संबंधित इतर आजार आहेत,अशा लोकांसाठी हे औषध लिहून दिले जाते.
मेड्युलरी थायरॉईड कार्सिनोमा (एमटीसी) या विशिष्ट प्रकारच्या थायरॉईड कर्करोग किंवा मल्टिपल एंडोक्राइन निओप्लासिया सिंड्रोम टाइप २ (एमईएन-२) या दुर्मिळ स्थितीचा कौटुंबिक इतिहास असलेल्या लोकांना हे औषध देण्यात येणार नाही.
हे निश्चितच एक परिणाकारक औषध असून वजन कमी करण्याच्या औषधाची आवश्यकता असलेल्या रुग्णांना तोंडावाटे सेमाग्लुटाइड आणि इंजेक्टेबल टिर्झेपॅटाइड यापैकी एक पर्याय शक्य असल्याचे फोर्टिस सी-डीओसी हॉस्पिटल फॉर डायबिटीजचे अध्यक्ष डॉ. अनूप मिश्रा म्हणाले. एका सेमाग्लुटाइडची किंमत १०,००० रुपये असून ही गोळी घेणे सोपे आहे.. माझ्या २५ टक्के रुग्णांना ज्यांना लठ्ठपणाविरोधी औषधाची आवश्यकता आहे ते सहजपणे टिर्झेपॅटाइड निवडतील तर आणखी ५० टक्के रुग्ण दोन्ही पर्यायांचा विचार करू शकतात, असेही मिश्रा म्हणाले.
तथापि, औषधाचा अविवेकी वापरामुळे आव्हाने निर्माण होऊ शकतात, असा इशाराही मिश्रा यांनी दिला. औषधाचा डोज योग्यरित्या दिला नाही किंवा रुग्णाचे काळजीपूर्वक निरीक्षण केले नाही, दुष्परिणामांबाबत नियम हा एक मुद्दा असेल, असे ते म्हणाले. महत्त्वाचे म्हणजे आहार आणि व्यायामाशिवाय हवे तितके वजन कमी करणे अशक्य असून हा जलद उपायही नसल्याचे मिश्रा म्हणाले.