अमेरिकेत समलिंगी संबंधांना पाठिंबा देणाऱ्यांच्या संख्येत घट झाली आहे. पाठिंबा देणाऱ्याचं हे प्रमाण ७१ टक्क्यांवरुन ६४ टक्क्यांवर घसरलं आहे. गॅलप पोलने (Gallup Poll) याबाबतचा सर्व्हे केला आहे. एक वर्षापूर्वी ७१ टक्के अमेरिकन्स हे समलिंगी संबंधांना पाठिंबा देत होते. मात्र ते प्रमाण आता ६४ टक्के इतकं घसरलं आहे असं या पोलच्या अहवालात नमूद करण्यात आलं आहे.
अमेरिकेतल्या विविध राज्यांमध्ये राहणाऱ्या प्रौढ व्यक्तींशी चर्चा करुन हा सर्व्हे तयार करण्यात आला आहे. साधारण विविध प्रकारच्या १ हजार लोकांशी या सर्व्हेसाठी चर्चा करण्यात आली. त्यानंतर याविषयीचा निष्कर्ष काढण्यात आला आहे. हा पोल घेणाऱ्या गॅलप या संस्थेने म्हटलं आहे की सर्व्हे करताना आम्हाला असं लक्षात आलं की अमेरिकेतले नागरिक हे लैंगिकता आणि त्या विषयाशी संबंधित अनेक मुद्द्यांना देत असलेला पाठिंबा कमी करत आहेत. यामध्ये जन्मदर नियंत्रण हा मुद्दाही समाविष्ट होता. ८८ टक्के अमेरिकी नागरिकांनी हा मुद्दा स्वीकारला. २०२२ मध्ये हे प्रमाण ९२ टक्के होतं.
अमेरिकेतल्या नागरिकांनी समलिंगी संबंधांना समर्थन देणं कमी केलं आहे. अमेरिकेत हे संबंध नैतिकदृष्ट्या स्वीकारार्ह आहेत. मात्र या संबंधांना समर्थन देणाऱ्या अमेरिकी नागरिकांचं प्रमाण हे सात टक्क्यांनी घटलं आहे. LGBTQ व्यक्तींच्या अधिकार आणि हक्कांविषयी अमेरिकेचं धोरण उदारमतवादी राहिल्याचंच दिसून आलं आहे. २००२ मध्ये ३८ टक्के अमेरिकन नागरिकांचं म्हणणं हे होत की सेम सेक्स संबंधांमध्ये गैर काहीच नाही. त्यानंतर या संबंधांना समर्थन देणाऱ्यांचं प्रमाण कमी झालं. तर २०१९ मध्ये हे प्रमाण ६४ टक्के इतकं होतं. २०१९ मध्ये या सगळ्यांनी सामाजिक दृष्ट्या हे संबंध स्वीकारले त्यात गैर काही नसल्याचं मत व्यक्त केलं होतं. News week ने याविषयीचं वृत्त दिलं आहे.
गॅलप पोलच्या सर्व्हेनुसार रिपब्लिकन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ५६ टक्के लोकांनी २०२२ मध्ये समिलिंगी संबंध ठेवणाऱ्या व्यक्ती नैतिकदृष्ट्या योग्य आहेत. यावर्षी हे प्रमाण ४१ टक्के इतकं आहे. २०१४ च्यानंतर समलिंगी संबंधांना समर्थन देण्याचं हे प्रमाण सर्वात कमी आहे. २०१४ मध्ये हे प्रमाण ३९ टक्के इतकं होतं.