इस्रायल आणि पॅलेस्टाइन या देशांमध्ये शांतता प्रस्थापित होणे कठीण असले तरी दोन्ही देशांच्या राजकीय नेत्यांनी कठीण निर्णय घेण्यासाठी तयार राहिले पाहिजे. धोका पत्करून दोन्ही देशांनी शांतता निर्माण केली पाहिजे, असे अमेरिकेने मंगळवारी सांगितले. पॅलेस्टाइन नेते महमद अब्बास यांनी अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांची भेट घेतली, त्या वेळी ओबामा यांनी अब्बास यांना शांततेसाठी पावले उचलण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले.
इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी पंधरवडय़ापूर्वी ओबामा यांची भेट घेतली होती, त्यानंतर आता अब्बास यांनी ओबामा यांची भेट घेतल्याने इस्रायल व पॅलेस्टाइन या देशांच्या शांतता प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. इस्रायलमध्ये तुरुंगात असलेल्या पॅलेस्टाइन कैद्यांच्या सुटकेचा विचार गांभीर्याने केला जात आहे, असे नेतान्याहू यांनी ओबामा यांना सांगितले होते.
इस्रायल आणि पॅलेस्टाइन या दोन्ही देशांच्या नेत्यांनी एकमेकांशी चर्चा करून हा प्रश्न सोडवावा आणि शांतता प्रस्थापित करावी, असे ओबामा यांनी अब्बास यांना सांगितले. ‘‘इस्रायलचे पंतप्रधान नेतान्याहू यांनाही काही आठवडय़ांपूर्वी शांततेचे आवाहन करण्यात आले होते. दोन्ही देशांत शांतता प्रस्थापित करणे कठीण व आव्हानात्मक आहे, याची मला जाणीव आहे. मात्र काही कठोर राजकीय निर्णय घेऊन धोका पत्करून शांततेचा मार्ग अवलंबणे गरजेचे आहे,’’ असे ओबामा यांनी सांगितले.
इस्रायलची तक्रार आणि पॅलेस्टाइनचे उत्तर
नेतान्याहू यांनी ओबामांची जेव्हा भेट घेतली, त्या वेळी त्यांनी पॅलेस्टाइनबाबत तक्रार केली होती. दोन्ही देशांमध्ये शांतता प्रक्रिया निर्माण होण्यासाठी इस्रायल गेल्या दशकभरापासून प्रयत्न करत आहेत. मात्र पॅलेस्टाइनने याबाबत कोणतेही पाऊल उचललेले नाही, असा त्यांच्या तक्रारीचा सूर होता. यावर पॅलेस्टाइन नेते अब्बास म्हणाले, शांतता प्रस्थापित करण्यासाठी आम्ही एक क्षणही वाया जाऊ दिला नाही. मात्र सध्या काळच आमच्या बाजूने नाही. सध्या मध्य पूर्व भागात सुव्यवस्थेची स्थिती कठीण झालेली असून, सर्वच देशांना त्याचा फटका बसत आहे.