पाकिस्तानने दहशतवादी गटांवर कारवाई केली नाही तर आंतरराष्ट्रीय पातळीवर तो आणखी एकाकी पडत जाईल, असा इशारा अमेरिकी काँग्रेसमधील भारतीय वंशाचे सदस्य अमी बेरा यांनी दिला आहे. अमी बेरा हे प्रतिनिधिगृहाच्या परराष्ट्र व्यवहार उपसमितीचे उपाध्यक्ष असून त्यांनी सांगितले, की जैश ए महंमद या संघटनेचा प्रमुख मसूद अझर याला जागतिक दहशतवादी घोषित करण्याविरोधातील नकाराधिकार चीनने मागे घेऊन सकारात्मक भूमिका पार पाडावी.
पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांनी दहशतवाद्यांवर कारवाई करण्यास सुरूवात केली तर अमेरिका त्यांच्या पाठीशी राहील, असे सांगून ते म्हणाले,की त्यांनी दहशतवाद्यांवर कारवाई केली तरच अर्थव्यवस्था सुधारण्यास मदत होईल. ‘टाइम फॉर पाकिस्तान टू चार्ट न्यू कोर्स’ या लेखात त्यांनी म्हटले आहे, की भारतीय हवाई दलाचे वैमानिक अभिनंदन वर्धमान यांना सोडून देऊन पाकिस्तानने योग्य कृती केली आहे. त्यामुळे संघर्ष चिघळण्याचे टळले. पंतप्रधान इम्रान खान यांनी या संधीचा फायदा घेऊन अमेरिकेशी संबंध सुधारावेत, पण त्यासाठी त्यांना दहशतवाद्यांवर कारवाई करणे आवश्यक आहे. पाकिस्तानने अनेक दहशतवादी संघटनांवर बंदी घालून ५ मार्चला कारवाई केली, पण त्यांच्या कारवाया सुरूच आहेत. त्यामुळे पाकिस्तान आंतरराष्ट्रीय पातळीवर एकटा पडत चालला आहे.