पाकिस्तानकडून वारंवार करण्यात येणाऱ्या शस्त्रसंधीच्या उल्लंघनामुळे भारत-पाक दोन्ही देशांमधील तणाव किती शिगेला पोहचला आहे, याचे प्रत्यंतर शनिवारी वाघा आंतरराष्ट्रीय सीमेवर पहायला मिळाले. वाघा सीमेवर ईदच्या दिवशी दोन्ही देशांकडून एकमेकांना मिठाई आणि शुभेच्छा देण्याची लष्करी परंपरा आहे. मात्र, यंदा सीमेवर निर्माण झालेल्या तणावामुळे ही परंपरा खंडित झाली आहे. गेल्या काही वर्षांपासून भारताचे सीमा सुरक्षा दल आणि पाकिस्तानी रेंजर्सकडून ही परंपरी अव्याहतपणे पाळली जात होती. गेल्या ऑक्टोबर महिन्यात ही परंपरा खंडित झाली होती. मात्र, त्यानंतरही दोनवेळेस दोन्ही बाजूच्या लष्कराकडून एकमेकांना मिठाई देण्यात आली होती. सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) अमृतसर सेक्टरचे महानिरीक्षक एम.एफ. फारुकी यांनी याबद्दल बोलताना, यंदा भारत आणि पाक लष्करामध्ये ईदनिमित्त मिठाईची देवाणघेवाण झाली नसल्याचे सांगितले. दोन्ही देशांच्या लष्करी अधिकाऱ्यांच्या बैठकीनंतर एकमेकांना मिठाई देण्याचा हा कार्यक्रम ठरवला जातो. यंदा या मुद्दयावर चर्चा झाली होती. मात्र, पाकिस्तानकडून कोणताही अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने आम्हीही याबाबत अधिक पाठपुरावा केला नसल्याचे फारुकी यांनी सांगितले. यापूर्वी २३ मार्च रोजी पाकिस्तान दिनानिमित्त पाक लष्कराकडून भारतीय अधिकाऱ्यांना मिठाई देण्यात आला होता.
दरम्यान, ईदच्या शुभेच्छा देण्यासाठी सीमा सुरक्षा दलाचे जवान हुसैनीवाला सीमेवर पाकिस्तानी सैन्यासाठी मिठाई व पुष्पगुच्छ घेऊन गेले होते. पण, पाकिस्तानी सैन्याने हे सर्व स्वीकारण्यास नकार दिल्याचे समजते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा