Factors to decide Alimony Amount: घटस्फोटानंतर पोटगीची रक्कम काय असावी, हे ठरविण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने आठ महत्त्वाचे घटक सांगितले आहेत. या घटकांचा विचार करून पोटगी किती द्यावी, हे ठरविता येऊ शकते. नुकतेच बंगळुरूतील अभियंता अतुल सुभाष यांच्या आत्महत्येमुळे घटस्फोट, त्यानंतरची न्यायालयीन लढाई हा विषय चर्चेत आला आहे. अतुल सुभाष यांनी मृत्यूपूर्वी पत्नी आणि सासरच्या मंडळीनी पैशांसाठी छळ केल्याचा आरोप केला आहे. हे प्रकरण चर्चेत असताना एका दुसऱ्या घटस्फोटाच्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश विक्रम नाथ आणि प्रसन्न बी. वराळे यांनी बुधवारी पोटगीसाठी आठ मुद्दे सांगितले.

प्रवीण कुमार जैन आणि अंजू जैन यांच्या घटस्फोटाच्या प्रकरणावर बुधवारी सुनावणी पार पडली. यावेळी खंडपीठाने आठ मार्गदर्शक घटक सांगितले. तसेच देशभरातील सर्व न्यायालयांनी निकाल देताना हे घटक डोळ्यासमोर ठेवावेत, असे आवाहन केले. या प्रकरणात प्रवीण कुमार जैन यांना पत्नीला पाच कोटी रुपये देण्याचे आदेश देण्यात आले. हिंदू विवाह कायद्याचा हवाला देताना सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने म्हटले की, जर लग्न पूर्ववत होण्याची कोणतीही चिन्ह दिसत नसतील तर पत्नीला कायमस्वरुपी पोटगी मिळण्याचा अधिकार मिळतो, असे लाईव्ह लॉने दिलेल्या बातमीत म्हटले आहे.

हे वाचा >> Atul Subhash Suicide: गुन्हे मागे घेण्यासाठी ३ कोटी, तर मुलाला भेटू देण्यासाठी ३० लाख रुपयांची पत्नीकडून मागणी; अतुल सुभाष आत्महत्या प्रकरणी भावाचा खुलासा

आठ घटक कोणते?

१) पती आणि पत्नीची सामाजिक आणि आर्थिक स्थिती

२) भविष्यातील पत्नी आणि मुलांच्या मूलभूत गरजा

३) दोन्ही पक्षकारांची शैक्षणिक पात्रता आणि नोकरी

४) मालमत्ता आणि उत्पन्नाचे स्त्रोत

५) सासरी राहत असताना पत्नीचे जीवनमान कसे होते.

६) कुटुंबासाठी पत्नीने आपल्या नोकरीचा त्याग केला होता का?

७) पत्नी जर कमवत नसेल तर तिला न्यायालयीन लढ्यासाठी किती खर्च आला.

८) नवऱ्याची आर्थिक स्थिती, त्याचे उत्पन्न, देखभालीचा खर्च आणि इतर जबाबदाऱ्या काय असतील?

सर्वोच्च न्यायालयाने वरील घटकांचा विचार करण्यास सांगितले असले तरी प्रत्येक प्रकरण वेगळे असल्यामुळे या घटकांचा आहे असाच विचार न करता त्यांच्याकडे केवळ मार्गदर्शक तत्त्व म्हणून पाहावे, असेही सांगितले.

प्रवीण कुमार जैन आणि अंजू जैन यांच्या घटस्फोट प्रकरणामुळे बंगळुरूतील अतुल सुभाष यांच्या प्रकरणाची सांगोपांग चर्चा होत आहे. अतुल सुभाष यांनी आत्महत्या करण्यापूर्वी स्वतःचा ८१ मिनिटांचा एक व्हिडीओ रेकॉर्ड केला आहे. तसेच २४ पानांची सुसाईड नोट लिहिली आहे. पत्नी आणि सासरच्या मंडळींच्या त्रासाला कंटाळून हे टोकाचे पाऊल उचलत असल्याचे अतुल सुभाष यांनी सांगितले.

Story img Loader