काँग्रेस खासदार ज्योतिरादित्य सिंधिया यांनी त्यांच्याच पक्षाचे खासदार शशी थरूर यांना खडे बोल सुनावले आहेत. पद्मावती सिनेमावरून काँग्रेसच्या दोन खासदारांमध्ये वाद रंगला आहे. खासदार शशी थरूर यांनी गुरूवारी पद्मावती सिनेमावरून टीका केली होती. ‘ब्रिटिशांनी देशावर कब्जा केला तेव्हा अनेक राजे-महाराजे त्यांच्या पुढे झुकले तर काहीजण पळून गेले. मात्र आता पद्मावती सिनेमावरून अनेक राजे-महाराजे एका दिग्दर्शकाच्या मागे लागले आहेत’ अशा आशयाचा ट्विट शशी थरूर यांनी केला होता. या ट्विटला उत्तर देताना ज्योतिरादित्य सिंधिया यांनी शशी थरूर यांना इतिहास वाचण्याचा सल्ला दिला आहे. एवढेच नाही तर मला माझ्या घराण्यावर मला गर्व आहे. माझ्या घराण्याचा इतिहास मला ठाऊक आहे, असेही सिंधिया यांनी स्पष्ट केले. ‘एएनआय’ या वृत्तवाहिनीकडे त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.
I think he should study history, I am Jyotiraditya Scindia and I am proud of my past: Jyotiraditya Scindia on Shashi Tharoor’s Maharaja remark pic.twitter.com/N6s7AQzEFu
— ANI (@ANI) November 17, 2017
ज्योतिरादित्य सिंधिया यांचे घराणे हे राजघराणे आहे. मध्य प्रदेशात ज्योतिरादित्य सिंधिया यांना महाराजा असे संबोधले जाते. पद्मावती सिनेमावरून शशी थरूर यांनी केलेले ट्विट सिंधिया यांना झोंबले आहेत. त्याचमुळे सिंधिया यांनी आज थरूर यांना आधी इतिहास वाचा आणि मग बोला असा सल्ला दिला आहे.
अशात शशी थरूर यांनी आपले वक्तव्य भाजप चुकीच्या पद्धतीने पसरवत असल्याचा आरोप करत सारवासारव केली आहे. जे राजे इंग्रजांच्या शासनकाळात त्यांच्यासोबत गेले त्यांचे मांडलिक झाले मी त्याच राजांवर टीका केली आहे इतर राजांवर नाही असे स्पष्टीकरण शुक्रवारी शशि थरूर यांनी दिले. राजपूत समाजाबाबत मला आदर आहे. तसेच देशानेही त्यांच्या भावना जपाव्यात आणि त्यांच्याबाबत आदर बाळगावा असाही सल्ला थरूर यांनी दिला आहे.
संजय लीला भन्साळी यांचा पद्मावती हा सिनेमा गेल्या काही दिवसांपासून वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. या सिनेमात राणी पद्मावतीचे चित्रण चुकीच्या पद्धतीने करण्यात आले असल्याचा आक्षेप राजपूत करणी सेनेने घेतला आहे. तसेच हा सिनेमा रिलिज झाल्यास देशव्यापी आंदोलनाचा इशारा दिला आहे. या वादात काँग्रेस नेते शशी थरूर यांनी उडी घेतली. त्यांनी केलेल्या ट्विटमुळे मात्र त्यांच्याच पक्षातील नेत्याचे खडे बोल त्यांना ऐकून घ्यावे लागले.