बांगलादेशमध्ये सत्तांतर झाल्यापासून हिंदू अल्पसंख्याकांवर अत्याचार होत आहेत. हिंदूबहुल असलेल्या भागांत हल्ले होणे, प्रार्थना स्थळांची विटंबना आणि धर्मगुरूंना अटक होण्याचे प्रकार आतापर्यंत घडले आहेत. मात्र आता बांगलादेशमध्ये भारतीय राष्ट्रध्वजाचा ठिकठिकाणी अवमान केला जात आहे. ही बातमी समोर आल्यानंतर पश्चिम बंगालच्या कोलकाता येथील जे.एन. रॉय रुग्णालयाने मोठा निर्णय घेतला आहे. बांगलादेशमधून येणाऱ्या रुग्णांवर यापुढे रुग्णालयात उपचार केले जाणार नाहीत, असे रुग्णालयाच्या संचालकांनी जाहीर केले आहे.
जे. एन. रॉय रुग्णालयाचे संचालक सुभ्रांषू भक्त म्हणाले, “राष्ट्र सर्वात महत्त्वाचे आहे. राष्ट्रापेक्षा कुणीही मोठा नाही. वैद्यकीय सेवा देणे हा परोपकारी व्यवसाय असला तरी देशाची प्रतिष्ठा ही त्याउपर आहे. आम्ही जो निर्णय घेतला, तसाच निर्णय इतर रुग्णालयांनीही घ्यावा.” भारतीय राष्ट्रध्वजाची विटंबना केल्याच्या निषेधार्थ रुग्णालयाने बांगलादेशमधील रुग्णांना सर्व प्रकारच्या वैद्यकीय सेवा नाकारण्याचा निर्णय घेतला आहे.
हे वाचा >> बांगलादेश पोलिसांनी दहशतवादी म्हणत ताब्यात घेतलेले इस्कॉनचे चिन्मय कृष्णा दास कोण आहेत?
आठवड्याच्या सुरुवातीला बांगलादेशात देशद्रोहाच्या आरोपाखाली हिंदू धर्मगुरू चिन्मय कृष्ण दास यांना अटक केली गेली. याप्रकरणी बांगलादेशने निष्पक्ष आणि पारदर्शक पद्धतीने सुनावणी घ्यावी, असे भारताकडून सांगण्यात आले. त्यानंतर बांगलादेशमध्ये ठिकठिकाणी भारतीय राष्ट्रध्वजाचा अवमान सुरू झाला. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जैस्वाल यांनीही बांगलादेशमध्ये हिंदू आणि इतर अल्पसंख्याकांवर होणाऱ्या अत्याचारावरून चिंता व्यक्त केली आहे.
प्रसिद्ध स्त्रीरोगतज्ञ इंद्रनील साहा म्हणाले की, मी बांगलादेशी रुग्णांवर उपचार करणे बंद केले आहे. गुरुवारी रात्री साहा यांनी आपल्या सोशल मीडिया हँडलवर बांगलादेशमध्ये राष्ट्रध्वजाचा विटंबना झाल्याचा फोटो शेअर केला होता. ते म्हणाले, बीयूइटी विद्यापीठाच्या प्रवेशद्वाराजवळ भारताचा राष्ट्रध्वज पडून आहे. त्यामुळेच आता मी बांगलादेशी रुग्णांना उपचार देणे बंद करत आहे. राष्ट्र सर्वप्रथम, त्यानंतर माझे उत्पन्न. मला वाटते, इतर डॉक्टरही या भूमिकेला समर्थन देतील.
पश्चिम बंगालच्या विधानसभेचे विरोधी पक्षनेते आणि भाजपा नेते सुवेंदू अधिकारी यांनीही शुक्रवारी अशाच प्रकारची मागणी केली होती. ते म्हणाले, इंद्रनील साहा यांच्या भूमिकेचे मी स्वागत करतो. तसेच भारतातील सर्वच वैद्यकीय कर्मचाऱ्यांना, व्यावसायिकांना आणि राष्ट्रप्रेमींना आवाहन करतो की, त्यांनी बांगलादेशवर संपूर्णपणे बहिष्कार टाकावा.