जम्मू : जम्मू-काश्मीरच्या जम्मू विभागामध्ये गेल्या काही महिन्यांपासून दहशतवादी हल्ले वाढले आहेत. त्या पार्श्वभूमीवर सुरक्षा दले सध्या वापरत असलेल्या दहशतवादविरोधी रणनीतीचे फेरमूल्यांकन करण्याची गरज आहे असा सल्ला सुरक्षाविषयक तज्ज्ञांनी दिला आहे. जम्म-काश्मीरमध्ये दहशतवादी कारवायांचे प्रमाण जास्त असताना काश्मीर खोरे अशांत होते. त्या तुलनेत जम्मू विभाग शांत होता. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून दहशतवाद्यांनी जम्मूला लक्ष्य केले आहे. जानेवारीपासून राजोरी, पूंछ, रियासी, उधमपूर, कथुआ, दोडा या जिल्ह्यांमध्ये दहशतवादी हल्ले वाढले आहेत. कथुआ जिल्ह्यातील हल्ल्यामध्ये एका कॅप्टनसह नऊ जवान शहीद झाले होते.
हेही वाचा >>> ‘दरडोई १८,००० डॉलरचे ध्येय ठेवा’ विकसित भारतासाठी निती आयोगाची दृष्टिकोन पत्रिका जारी
उधमपूरमधील नॉर्दर्न कमांडचे माजी प्रमुख लेफ्ट. जनरल (निवृत्त) डी एस हुडा यांनी सांगितले की, दहशतवाद्यांच्या नवनवीन क्लृप्त्यांना उत्तर देण्यासाठी सक्रिय दृष्टिकोन ठेवण्याची गरज आहे. तर माजी लष्कर उपप्रमुख (व्यूहरचना) लेफ्ट जनरल परमजित सिंह संघा यांनी सुरक्षा दलांवर आपला विश्वास व्यक्त केला आहे. ते आपल्या चुकांमधून शिकतील आणि प्रयत्नांमध्ये सुधारणा करतील अशी आशा त्यांनी बोलून दाखवली. लेफ्ट. जनरल (निवृत्त) हुडा म्हणाले की, ‘‘काही काळापासून आपल्याला त्यांच्या क्लृप्त्यांमध्ये बदल झाल्याचे दिसून येत आहे. ते आता अचानक हल्ला करणे, गोळीबार करून पळून जाणे या रणनीतींचा वापर करत आहेत. त्यामुळे सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांची बदललेली रणनीती समजून घेऊन आपल्या संभाव्य उणीवा दुरुस्त करणे आवश्यक आहे.’’ जम्मू आणि काश्मीर या दोन्ही विभागांमध्ये दहशतवाद्यांच्या रणनीतीमध्ये फरक समजून सांगताना हुडा यांनी स्पष्ट केले की, ‘‘काश्मीरमधील दहशतवादी लोकांमध्ये वावरत असत, तर जम्मूमध्ये त्यांनी आव्हानात्मक भूभागांवर लक्ष केंद्रित केले आहे. त्यामुळे त्यांना प्रतिसाद देताना गुंतागुंत वाढली आहे.’’ तर, ‘‘आपण प्रामाणिकपणे आपल्या चुकांपासून शिकण्याची गरज आहे. तसेच धीर धरणे आणि पारंपरिक लष्करी क्ल्पृत्या न विसरणे महत्त्वाचे आहे,’’ असे लेफ्ट जनरल संघा यांनी सांगितले.