प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेता किच्चा सुदीप भाजपात प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. अशातच त्याला एक धमकीचं पत्र आल्याने खळबळ उडाली आहे. किच्चा सुदीपच्या मॅनेजरने हे पत्र स्वीकारलं. मात्र हे धमकीचं पत्र असेल याची त्याला कल्पना नव्हती. आता या प्रकरणी पोलिसात तक्रार देण्यात आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

किच्चा सुदीपच्या मॅनेजरने काय माहिती दिली?

किच्चा सुदीपचा मॅनेजर जॅक मंजू याने ही माहिती दिली की किच्चा सुदीपच्या नावे एक निनावी पत्र आलं आहे. त्यात किच्चा सुदीपचा प्रायव्हेट व्हिडीओ लिक करण्याची धमकी देण्यात आली आहे. या धमकीच्या पत्राची अभिनेत्याने आणि त्याच्या मॅनेजरने दखल घेतली आहे आणि या प्रकरणी पोलीस तक्रार दाखल केली आहे. या पत्रात किच्चा सुदीपविषयी अपमानजनक भाषाही वापरण्यात आली आहे.

जॅक मंजू हे अभिनेता किच्चा सुदीपचे निकटवर्तीय मानले जातात. धमकीचं पत्र आल्यानंतर बंगळुरूच्या पुत्तनहल्ली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. भारतीय दंड संहितेच्या कलम ५०४, ५०६ आणि १२० बी च्या अंतर्गत ही तक्रार दाखल करण्यात आली आहे. बंगळुरू शहर पोलिसांनी हे प्रकरण गुन्हे शाखेकडे सोपवलं आहे.

किच्चा सुदीप भाजपात प्रवेश करणार?

पुढच्या महिन्यात कर्नाटकमध्ये विधानसभा निवडणूक पार पडणार आहे. या पार्श्वभूमीवर किच्चा सुदीप भाजपात प्रवेश करू शकतो अशा शक्यता वर्तवण्यात आल्या आहेत. नुकतीच किच्चा सुदीपने कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांचीही भेट घेतली होती. बुधवारी बसवराज बोम्मई यांची पत्रकार परिषद होणार आहे.या पत्रकार परिषदेत किच्चा सुदीप भाजपात प्रवेश करणार का? हे पाहणं महत्वाचं असणार आहे. किच्चा सुदीप भाजपाचा प्रचार करणार का? आणि निवडणूक लढवणार का? या प्रश्नाचं उत्तरही अद्याप मिळणं बाकी आहे.

किच्चा सुदीपच्या जवळच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार किच्चा सुदीप त्याच्या घरातल्या लोकांशी चर्चा केल्यानंतर भाजपात प्रवेश करायचा की फक्त त्यांचा प्रचार करायचा याचा निर्णय घेणार आहे. तर जॅक मंजू यांनी दिलेल्या माहितीनुसार किच्चा सुदीप भाजपाकडून विधानसभा निवडणुकीचं तिकीट मागू शकतो. मध्य कर्नाटकात किच्चा सुदीपचं फॅन फॉलोईंग मोठ्या प्रमाणावर आहे त्याचा फायदा किच्चा सुदीपला होऊ शकतो.