राजस्थानमधील प्रसिद्ध पुष्कर जत्रेमध्ये ‘विहिंप’च्या (विश्व हिंदू परिषद) धास्तीमुळे गेल्या दोन वर्षांत गायींची विक्री ९४ टक्क्यांनी घटल्याचे निदर्शनास आले आहे. या जत्रेत मोठ्याप्रमाणावर गोधन विक्रीसाठी आणले जाते. त्यामुळे गुरांचा व्यापार आणि पर्यटनाच्यादृष्टीने ही जत्रा महत्त्वाची मानली जाते. मात्र, यंदाच्या वर्षी या जत्रेत विक्रीसाठी गायी आणण्याचे प्रमाण ८९ टक्क्यांनी कमी झाल्याचे अधिकृत माहितीवरून दिसते आहे. यासाठी शेती उत्त्पन्नातील घट प्रामख्याने कारणीभूत असली तरी हिंदू संघटनांची प्राण्यांच्या या जत्रेवर असणारी करडी नजर हेदेखील महत्त्वाचे कारण असल्याचे येथील लोकांचे म्हणणे आहे. याठिकाणी प्राण्यांची तस्करी करणारे अनेकजण खरेदीदार म्हणून येत असल्याने आम्ही या जत्रेवर नजर ठेवून असल्याचे चित्तोडमधील ‘विहिंप’चे प्रांत प्रभारी सुरेश गोयल यांनी सांगितले.
२०१२-१३ मध्ये याठिकाणी ४,२७० गुरे आणण्यात आली होती आणि यापैकी २,१७८ गुरांची विक्री झाली होती. मात्र, यंदाच्या वर्षी जत्रेत केवळ ४५२ गुरेच आणण्यात आली आणि त्यापैकी १३३ गुरांची विक्री झाल्याची माहिती राजस्थानच्या पशुवैद्यकीय विभागाने दिली. या जत्रेत आणल्या जाणाऱ्या सर्वच गुरांची विक्री होत नसली तरी हे प्रमाण गेल्या दोन वर्षांइतके निराशाजनक कधीच नव्हते. गेल्यावर्षी या जत्रेतून गुरांच्या मालकांनी तब्बल ९.४ कोटी कमावले होते तर यावर्षी उत्त्पन्नाचा हाच आकडा ५.८५ कोटींपर्यंत घसरला आहे. या उत्त्पन्नामध्ये गाई, म्हशी, बैल, घोडे, शेळी, उंट, मेंढ्यांच्या विक्रीचा समावेश आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा