Tirupati Laddu Row तिरुमला तिरुपती बालाजी मंदिरातील प्रसाद लाडूंमध्ये भेसळ झाल्याचा मुद्दा देशभरात गाजतो आहे. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांनी जगन रेड्डींवर हा आरोप केला होता. जगन रेड्डी यांच्या कार्यकाळात तिरुपती बालाजी ( Tirupati Laddu Row ) मंदिरातील प्रसाद लाडूंमध्ये जनावरांची चरबी मिसळण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला होता. ज्यानंतर खळबळ उडाली. आता ओडिशातील जगन्नाथ पुरी मंदिराने मोठा निर्णय घेतला आहे.

पुरीचे जिल्हाधिकारी काय म्हणाले?

जगन्नाथ पुरी मंदिराचे जिल्हाधिकारी सिद्धार्थ शंकर यांनी सांगितलं की तुपात भेसळ केली गेल्याची जी बातमी समोर आली त्यानंतर आता आम्ही जगन्नाथ पुरी मंदिराला जे तूप पुरवलं जातं त्या तुपाचीही तपासणी करणार आहोत. आम्ही याबाबत दूधसंघाला कळवलं आहे. जगन्नाथ पुरी हे कृष्णाचं पवित्र मंदिर आहे. लाखो भाविक या ठिकाणी येत असतात. त्यामुळे या ठिकाणी ज्या तुपाचा पुरवठा केला जातो ते शुद्ध तूपच असलं पाहिजे असं आम्ही आधीच पुरवठा करणाऱ्या दूध संघाला बजावलं आहे. मात्र तिरुपती मंदिर प्रसाद लाडू ( Tirupati Laddu Row ) प्रकरणात जी माहिती समोर आली त्यानंतर आम्ही आता तूप तपासण्याचा निर्णय घेतला आहे.

जिल्हा प्रशासनाने काय म्हटलं आहे?

तिरुपती बालाजी मंदिरात जे लाडू तयार कऱण्यात आले त्यातल्या तुपात भेसळ ( Tirupati Laddu Row ) होती ही बाब समोर आली. त्यानंतर आम्ही आता जगन्नाथ पुरी मंदिरातील प्रसादासाठी पुरवण्यात येणाऱ्या तुपाची चाचणी करणार आहोत. जगन्नाथ पुरी मंदिरात रोज हजारो भाविक येतात. या ठिकाणी जे स्वयंपाक घर आहे त्या स्वयंपाक घराची क्षमता एक लाख जणांचं जेवण तयार करण्याची आहे.

जगन्नाथ पुरी मंदिरातला प्रसाद हा पवित्र प्रसाद मानला जातो

जगन्नाथ पुरी मंदिरात जो प्रसाद तयार केला जातो त्यासाठी चुलीचा आण लाकडांचा वापर केला जातो. तसंच यातला मुख्य घटक पदार्थ हा तूप आहे. प्रसाद तयार झाल्यानंतर आधी त्याचा नैवैद्य भगवान जगन्नाथ, देवी बिमला यांना दाखवण्यात येतो. त्यानंतर या प्रसादाचा महाप्रसाद होतो. तिरुपती बालाजी मंदिराच्या प्रसाद लाडूंमध्ये जशी भेसळ झाली तशी भेसळ तुपात असू नये म्हणून जे साठवून ठेवलेलं तूप आहे त्याची आणि मागवलं जाणाऱ्या तुपाची चाचणी करण्यात येणार आहे. इंडियन एक्स्प्रेसने हे वृत्त दिलं आहे.