China-India Relation Visa Rules Relaxed : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनवर टॅरिफ अस्त्र उगारल्यानंतर चीनला मित्रत्वाची उपरती झाली आहे. चीनच्या परराष्ट्र विभागाने अलीकडेच भारताला म्हटलं आहे की “आता आपण एकत्र यायला हवं!” पाठोपाठ चीनने आणखी एक मोठं पाऊल उचललं आहे. चीनी दूतावासाने यावर्षी ८५ हजारांहून अधिक भारतीयांना व्हिसा जारी केला आहे. १ जानेवारी ते ९ एप्रिल या सव्वातीन महिन्यांच्या काळात ८५,००० भारतीयांचा चीनला जाण्याचा व्हिसा मंजूर झाला आहे.
चीनने भारतीयांना व्हिसा देण्याच्या बाबतीत सौम्यपणा अंगीकारला आहे. ड्र्रॅगनने दोन्ही देशांमधील संबंध सुधारण्याच्या दृष्टीने छोटी-छोटी पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे. दुसऱ्या बाजूला डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनमधून आयात होणाऱ्या वस्तूंवरील आयात कर १४५ टक्क्यांपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतल्यानंतर चीनने अमेरिकेवरून आयात होणाऱ्या वस्तूंवरील आयात शुल्क १२५ टक्के केलं आहे. पाठोपाठ, ट्रम्प यांनी चीनी आयातीवरील शुल्क २४५ टक्के केलं आहे.
चीनी सरकारचं भारतीयांना आमंत्रण
भारतातील चीनचे राजदूत शू फेइहोंग यांनी अधिकाधिक भारतीयांनी आपल्या देशात यावं आणि इथल्या वातावरणाचा अनुभव घ्यावा असं म्हणत भारतीयांना आमंत्रित केलं आहे. यासह चीनकडून जारी केल्या जाणाऱ्या व्हिसाच्या प्रमाणात चांगलीच वाढ झाली आहे. २०२३ मध्ये १,८०,०० भारतीयांना चीनचा व्हिसा मिळाला होता. तर, यावर्षी सव्वातीन महिन्यात चीनी सरकारने तब्बल ८५,००० भारतीयांना व्हिसा जारी केला आहे. याच गतीने चिनी सरकार भारतीयांचे व्हिसा अर्ज मंजूर करत राहिलं तर या वर्षात सव्वादोन लाखांहून अधिक भारतीयांना व्हिसा मिळेल.
व्हिसाच्या नियमांत शिथिलता
मागील वर्षी चीनने व्हिसा संबंधित नियमांमध्ये मोठ्या प्रमाणात शिथिलतला आणली आहे. उदारहणार्थ चीनचा व्हिसा हवा असल्यास भारतीयांना पूर्वी व्हिसा अर्ज सादर करण्यापूर्वी ऑनलाइन अपॉइंटमेंट बूक करावी लागत होती. आता त्याची आवश्यकता भासत नाही. त्याऐवजी ते कोणत्याही कामाच्या दिवशी (ज्या दिवशी आठवड्याची सुट्टी नसते किंवा कुठल्याही सण-समारंभाची सुट्टी नसते असा दिवस) थेट व्हिसा केंद्रावर जाऊन अर्ज सादर करू शकतात.
व्हिसा शुल्कात कपात
यासह १८० हून कमी दिवसांसाठी चीनला जाणाऱ्या, सिंगल किंवा डबल एंट्री व्हिसासाठी अर्ज करणाऱ्या लोकांना फिंगरप्रिंट देण्यासारख्या नियमांतून सूट देण्यात आली आहे. तसेच चीनने व्हिसा शुल्क देखील कमी केलं आहे.
चीनचं भारतीयांना आवाहन
चीन अचानक भारताबरोबरचे संबंध सुधारण्यावर इतका भर का देतोय असा प्रश्न अनेकांना पडला आहे. अमेरिकेबरोबर व्यापार युद्ध चालू असताना चीनने भारतासह अनेक मोठ्या देशांकडे आग्रह केला आहे की अमेरिका जगावर व्यापारयुद्ध लादू पाहतेय, अशा वेळी आपण एकत्र उभं राहायला हवं.”