भ्रष्टाचाराचे आरोप असलेले केरळचे अर्थमंत्री के. एम. मणी यांना अर्थसंकल्प सादर करू न देण्यासाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या आमदारांनी तेथील विधानसभेत शुक्रवारी अभूतपूर्व गोंधळ घातला. गोंधळाच्या वातावरणातच मणी यांनी गडबडीत अर्थसंकल्पाचे थोडक्यात वाचन करून तो विधानसभेच्या पटलावर सादर केला. दरम्यान, कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यकर्त्यांनी विधानभवनाबाहेरही जोरदार शक्तीप्रदर्शन केले. यावेळी कार्यकर्त्यांना रोखण्यासाठी पोलीसांना पाण्याचा फवारा मारावा लागला. कार्यकर्ते आणि पोलीसांमध्ये झालेल्या धुमश्चक्रीत अनेकजण जखमी झाले आहेत.
विधानसभेमध्ये मणी यांना विरोध करण्यासाठी विरोधी पक्षातील आमदारांनी धुमाकूळ घातला. सत्ताधारी आणि विरोधकामध्ये यावेळी झटापट झाली त्याचबरोबर विरोधी आमदारांना रोखण्यासाठी आलेल्या विधान भवनाच्या सुरक्षारक्षकांसोबतही त्याची झटापट झाली. सुरक्षारक्षकांनी आपल्याला मारहाण केल्याचा आरोप या आमदारांनी केला आहे. विरोधक काहीही केल्या ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्यामुळे अर्थसंकल्प सभापटलावर ठेवण्यात आल्यावर अध्यक्षांनी विधानसभेचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब केले. त्यानंतर मणी यांनी पत्रकार कक्षात जाऊन तिथे अर्थसंकल्पातील तरतुदींचे सविस्तर वाचन केले.
विधानसभेचे कामकाज शुक्रवारी सुरू झाल्यावर विरोधकांनी मणी यांना सभागृहात येण्यापासूनच रोखले. त्यांना सभागृहात येऊ देण्यासाठी सुरक्षारक्षक प्रयत्नशील असतानाच विरोधकांची त्यांच्याशी झटापट झाली. यानंतर सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास विरोधकांनी अध्यक्षांजवळील जागेत जाऊन मणी यांना तेथेही येऊ देण्यास रोखले. परंपरेप्रमाणे अर्थमंत्री तेथूनच अर्थसंकल्पाचे वाचन करीत असतात. त्यातच मणी यांनी कसेबसे अर्थसंकल्पाचे अगदी थोडक्यात वाचन करून तो सभापटलावर ठेवला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Amidst unprecedented protest within and outside kerala assembly finance minister k m mani tabled the budget