गेल्या महिन्यात काँग्रेस नेते राहुल गांधी यांना त्यांचा शासकीय बंगला सोडण्याचे निर्देश देण्यात आले. त्यानुसार राहुल गांधींनी २२ एप्रिल रोजी त्यांचा शासकीय बंगला सोडला. या वेळचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागले आहेत. प्रियांका गांधी सोशल बंगल्याच्या दरवाजाला कडी लावताना तर राहुल गांधी कुलूप लावताना या व्हिडीओत दिसत आहेत. या व्हिडीओवर काँग्रेस कार्यकर्ते आणि नेटिझन्सकडून संमिश्र प्रतिक्रिया येत असतानाच याचवेळचा आणखीन एक व्हिडीओ भाजपाकडून व्हायरल केला जात आहे!
अमित मालवीय यांचं ट्वीट आणि व्हिडीओ!
भाजपा आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी राहुल गांधींनी बंगला रिकामा केला तेव्हाचा एक व्हिडिओ त्यांच्या ट्विटर हँडलवर शेअर केला आहे. बंगल्यातून बाहेर पडताना राहुल गांधींनी त्यांच्या कर्मचाऱ्यांशी हस्तांदोलन केल्याचा हा व्हिडीओ आहे. हा व्हिडीओ शेअर करताना अमित मालवीय यांनी केलेल्या ट्वीटमधून टीकाही करण्यात आली आहे. “राहुल गांधींनी त्यांच्या बंगल्यावरील कर्मचाऱ्यांशी हस्तांदोलन केल्यानंतर पँटला हात पुसले. या कर्मचाऱ्यांनी त्यांच्यासाठी कित्येक वर्षं काम केलं आहे. किती तिरस्कार…”, असं मालवीय यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.
काय आहे व्हिडिओमध्ये?
अमित मालवीय यांनी ट्वीट केलेल्या व्हिडीओमध्ये राहुल गांधी त्यांच्या बंगल्यावरील कर्मचाऱ्यांशी हस्तांदोलन करताना दिसत आहेत. त्यांच्यासमोर सर्व कर्मचारी रांगेने त्यांना निरोप देण्यासाठी उभे आहेत. राहुल गांधींनी सर्व कर्मचाऱ्यांशी एकेक करून हस्तांदोलन केल्यानंतर सगळ्यात शेवटी त्यांच्या पँटला हात लावल्याचं व्हिडीओत दिसत आहेत. भाजपाचे अमित मालवीय यांनी नेमक्या याच कृतीवर आक्षेप घेत राहुल गांधींनी हात पुसल्याचा दावा केला आहे.
काँग्रेसचं प्रत्युत्तर!
दरम्यान, अमित मालवीय यांनी व्हिडीओ ट्वीट करत टीका केल्यानंतर त्यावर काँग्रेसचे राष्ट्रीय स्तरावरील नेते नितीन अगरवाल यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. “हा एडिट केलेला व्हिडीओ आहे. तुमचं आयुष्य व्यर्थ आहे. सकाळी उठा, व्हिडीओ एडिट करा, मग त्याचे दोन भाग करा आणि तुमच्या बॉसला खूश करण्यासाठी दिवसभर तो व्हिडीओ व्हायरल करत राहा”, असं अगरवाल म्हणाले आहेत.
राहुल गांधींची खासदारकी रद्द झाल्यानंतर त्यांना बंगला रिकामा करण्याचे निर्देश देण्यात आले होते. २०१९च्या एका प्रकरणात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आडनावाचा चुकीच्या पद्धतीने वापर केल्याच्या आरोपाखाली त्यांच्यावर मानहानीचा खटला चालला होता. त्यात सुरत न्यायालयाने त्यांना दोषी सिद्ध केल्यानंतर त्यांचं लोकसभा सदस्यत्व रद्द करण्याची कारवाई करण्यात आली. त्यानंतर १२ तुघलक रोडवरील बंगला २२ एप्रिलपर्यंत रिकामा करण्याचे निर्देश राहुल गांधींना देण्यात आले. यानंतर राहुल गांधींनी आपलं सगळं सामान सोनिया गांधी यांच्या १० जनपथ बंगल्यावर हलवलं आहे.