|| मयुरा जानवलकर
पुढील महिन्यात होणाऱ्या गोवा विधानसभा निवडणुकीसाठी, व्यवसायाने वकील असलेले आणि आता राजकारणात आलेले अमित पालेकर यांची आम आदमी पक्षाने बुधवारी आपला मुख्यमंत्रिपदाचा चेहरा म्हणून घोषणा केली.
आम आदमी पक्षाने मंगळवारी पंजाब विधानसभा निवडणुकीसाठी भगवान मान यांची मुख्यमंत्रीपदाचा चेहरा म्हणून घोषणा केली होती, त्यानंतर दुसऱ्याच दिवशी अमित पालेकर यांची गोव्याचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार म्हणून पक्षाने घोषणा केली.
४६ वर्षांचे पालेकर यांनी अलीकडेच ‘आप’ मध्ये प्रवेश केला असून, सध्या भाजपच्या ताब्यात असलेल्या सेंट क्रूझ विधानसभा मतदारसंघात ते पक्षाचे उमेदवार राहणार आहेत.
‘आप’चे राष्ट्रीय संयोजक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अर्रंवद केजरीवाल यांनी पणजीत अमित यांच्या नावाची घोषणा केली. पालेकर हे भंडारी समाजाचे असून गोव्यातील इतर मागासवर्गीय समाजात भंडारी समाजाची संख्या मोठी आहे़ मात्र जातीचे राजकारण म्हणून पालेकर यांची निवड करण्यात आली नसून प्रामाणीक व्यक्ती असलेल्या पालेकर यांची गोव्याच्या विकासासाठी काम करण्याची इच्छा आहे, असे केजरीवाल यांनी सांगितले़
‘गोव्याला बदल हवा असून या किनारी राज्यात आमच्या पक्षाला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. प्रशासनाच्या दिल्ली मॉडेलमुळे लोक प्रभावित आहेत,’ असे केजरीवाल या वेळी म्हणाले.
या वेळी पक्षाने राज्यभरात नव्या चेहऱ्यांना संधी दिली आहे. पालेकर हा गोव्यासाठी नवा चेहरा असून, ते गोव्यासाठी जीवही देण्यास तयार आहेत, असे केजरवील यांनी सांगितले.
‘जातीचे राजकारण नाही’
गोव्यातील आपला मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार भंडारी समाजातील असेल असे ‘आप’ने जाहीर केले होते. त्यानुसार या समाजातील पालेकर यांची निवड करण्यात आली आहे. तथापि, यातून पक्ष जातीचे राजकारण करत असल्याचा आरोप केजरीवाल यांनी नाकारला. गोव्यात भंडारी समाजाची लोकसंख्या ३० ते ४० टक्के असून त्यांना न्याय देण्याचा प्रयत्ना करणार आहे, असे केजरीवाल म्हणाले.