मागील काही दिवसात कट्टरतावाद्यांकडून जम्मू काश्मीरमध्ये सामान्य नागरिकांसह सुरक्षा दलावरही हल्ले झाले. यात अनेक जणांना आपला जीव गमवावा लागला. या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह ३ दिवसीय जम्मू काश्मीर दौऱ्यावर आलेत. यावेळी त्यांनी सर्वात आधी कट्टरतावाद्यांच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्या पोलीस अधिकाऱ्यांच्या कुटुंबाला भेट दिली. तसेच मृत अधिकारी परवेज अहमद यांच्या पत्नीला सरकारी नोकरीची कागदपत्रे सूपूर्त केली. शाह यांच्या या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आलीय.
जम्मू काश्मीरचा पूर्ण राज्याचा दर्जा रद्द करत कलम ३७० हटवल्यानंतर अमित शाह यांचा हा पहिला काश्मीर दौरा आहे. त्यामुळे २ वर्षांनंतर होणारा हा दौरा महत्त्वाचा मानला जात आहे. शाह यांचं उपराज्यपाल मनोज सिन्हा यांनी विमानतळावर स्वागत केलं.पोलीस अधिकाऱ्याच्या कुटुंबाला भेट देताना देखील ते शाह यांच्या सोबतच होते. याशिवाय केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह आणि पोलीस महासंचालक दिलबाग सिंह हे देखील या भेटीच्या वेळी उपस्थित होते.
मागील काही दिवसांत नागरिकांवरील हल्ल्यात वाढ
मागील काही दिवसांमध्ये काश्मीर खोऱ्यात सामान्य नागरिकांवरील हल्ल्यांमध्ये वाढ झालीय. यात मखनलाल बिंद्रू या शिख शिक्षकाचा आणि एका मुस्लीम नागरिकाचाही मृत्यू झालाय. त्यांच्याही कुटुंबाला शाह भेट देणार आहेत. त्यामुळे अमित शाह राजभवनात जम्मू काश्मीरमधील सुरक्षा व्यवस्थेवर उच्चस्तरीय बैठक घेणार आहेत. यावेळी ४ कोअरचे कमांडर, जम्मू काश्मीर पोलीस दलाचे उच्च अधिकारी, गुप्तचर संस्थेचे विभागीय प्रमुख आणि केंद्रीय सुरक्षा दलाचे अधिकारी उपस्थित राहणार आहेत.
हेही वाचा : दिग्विजय सिंह यांनी केलं RSS आणि अमित शाहांचं कौतुक; म्हणाले…
पुलवामात शहीद ४० जवानांनाही आदरांजली वाहणार
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह या दौऱ्यात पुलवामा जिल्ह्यातील लेथपोरा येथेही भेट देणार आहेत. तेथे ते फेब्रुवारी २०१९ मध्ये दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या ४० जवानांना आदरांजली वाहतील. स्फोटकांनी भरलेली कार घेऊन एका आत्मघातकी दहशतवाद्यानं सीआरपीएफच्या ताफ्याजवळ स्फोट घडवला होता. यात भारताचे ४० जवान शहीद झाले.