काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी आज लोकसभेत भाषण करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका केली. मी मणिपूरला जाऊ शकतो पण तुम्ही जाऊ शकत नाहीत. कारण तुम्ही मणिपूरमध्ये हिंदुस्थानाची हत्या केली. भाजपाचे लोक हे देशभक्त नाहीत तर देशद्रोही आहेत असंही राहुल गांधी यांनी म्हटलं आहे. तसंच नरेंद्र मोदींची तुलना आज राहुल गांधी यांनी रावणाशी केली. रावण ज्याप्रमाणे कुंभकर्ण आणि मेघनाद यांचंच ऐकत होता तसंच नरेंद्र मोदी करत आहेत असं राहुल गांधींनी म्हटलं आहे.
काय म्हणाले राहुल गांधी?
“भारताचं लष्कर हे मणिपूरमध्ये एका दिवसात शांतता प्रस्थापित करु शकते. मात्र तुम्ही लष्कराला तिथे पाचारण करत नाही. कारण तुम्हाला मणिपूरमध्ये देश संपवायचा आहे. नरेंद्र मोदी हे देशाचा आवाज ऐकत नाहीत. ते फक्त दोन लोकांचा आवाज ऐकतात. कोणाचं ऐकतात माहित आहे का? रावण दोघांचं ऐकायचा, मेघनाद आणि कुंभकर्ण. त्याचप्रमाणे नरेंद्र मोदी दोघांचंच ऐकतात एक अमित शाह आणि दुसरे अदाणी. लंका हनुमानाने जाळली नाही. लंका रावणाच्या अहंकारामुळे जळाली. रामाने रावणाला मारलं, रावणाच्या अहंकाराने मारलं. तुम्ही सगळ्या देशात आता केरोसीन फेकण्याचं काम करत आहात. आधी तुम्ही मणिपूरमध्ये केरोसीन फेकलं आणि आग लावली. आता तुम्ही हरियाणात तेच करत आहात. संपूर्ण देशात तुम्हाला हेच करायचं आहे.” असं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.
हे पण वाचा- Rahul Gandhi Speech: “नरेंद्र मोदी मणिपूरमध्ये जाऊ शकत नाहीत कारण…”, राहुल गांधींचा केंद्र सरकारवर हल्लाबोल!
“मोदींसाठी मणिपूर हिंदुस्थान नाही”
“काही दिवसांपूर्वी मी मणिपूरला गेलो. आमचे पंतप्रधान आजपर्यंत गेले नाहीत. कारण त्यांच्यासाठी मणिपूर हिंदुस्थान नाही. मी मणिपूर शब्दाचा वापर केला. पण आज मणिपूर वाचलेलं नाही. मणिपूरला तुम्ही दोन भागांमध्ये वाटलं आहे. मी मणिपूरच्या रिलीफ कॅम्पमध्ये गेलो. तिथे महिलांशी बोललो. मुलांशी बोललो. जे आपल्या पंतप्रधानांनी आजपर्यंत केलं नाही. एका महिलेला मी विचारलं, तुमच्याबरोबर काय झालं? तर एक महिला म्हणाली, माझ्या डोळ्यांसमोर माझ्या मुलाला गोळी मारली गेली. मी रात्रभर त्याच्या प्रेताबरोबर झोपले होते”, असं राहुल गांधी म्हणाले.
हे पण वाचा- “पंतप्रधान नरसिंह राव यांनी आमचे ऐकले नाही; भाजपावर विश्वास ठेवला आणि बाबरी पाडली”, शरद पवार यांचा मोठा दावा
“यांनी मणिपूरमध्ये हिंदुस्थानची हत्या केली आहे. यांच्या राजकारणानं मणिपूरला नाही, हिंदुस्थानला मणिपूरमध्ये मारलं आहे. हिंदुस्थानची हत्या केली आहे. यांनी मणिपूरमध्ये भारतमातेची हत्या केली. तुम्ही मणिपूरच्या लोकांना मारून हिंदुस्थानची हत्या केली. तुम्ही देशद्रोही आहात. त्यामुळेच तुमचे पंतप्रधान मणिपूरमध्ये जाऊ शकत नाहीत. कारण त्यांनी मणिपूरमध्ये भारत मातेची हत्या केली आहे. तुम्ही भारत मातेचे रक्षक नसून भारत मातेचे खूनी आहात”, अशा आक्रमक शब्दांमध्ये राहुल गांधींनी हल्लाबोल केला.