Amit Shah Canada alleges for Violence against Sikh Separatists : भारत आणि कॅनडाचे संबंध दिवसेंदिवस खराब होत चालले आहेत. कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन ट्रुडो सातत्याने भारतविरोधी शक्तींना देशात आश्रय देत असल्याचं पाहायला मिळत आहे. तर, कॅनडातील काही हिंसक घटनांप्रकरणी तिथल्या जस्टिन ट्रुडो सरकारने भारतावर गंभीर आरोप केले आहेत. परंतु, भारताने ते आरोप फेटाळले आहेत. त्यापाठोपाठ भारताने आपले कॅनडातील उच्चायुक्त आणि अन्य राजनैतिक अधिकार्‍यांना परत बोलावून घेतलं आहे. त्यानंतर कॅनडाचे भारतातील अधिकारी देखील मायदेशी परतले आहेत. खलिस्तानी फुटीरतावादी हरदीपसिंग निज्जरच्या हत्येत भारताच्या कथित सहभागाबाबतच्या आरोपानंतर भारत व कॅनडाचे संबंध बिघडले आहेत. दरम्यान, आता ट्रुडो सरकारने भारताचे गृहमंत्री अमित शाह यांच्यावर आरोप केले आहेत. अमित शाह यांचा कॅनडातील हिंसक घटनांमध्ये सहभाग असल्याचा आरोप कॅनडाने केला आहे. हे आरोप करत असताना त्यांनी कुठलाही पुरावा मात्र दिलेला नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दरम्यान, कॅनडाने कोणत्याही पुराव्यांशिवाय केलेल्या आरोपांवर भारताने कुठल्याही प्रकारची प्रतिक्रिया दिलेली नाही. यापूर्वी कॅनडाने भारतीय उच्चायुक्त संजय कुमार वर्मा यांच्यावरही अशाच प्रकारचे आरोप केले होते. तेव्हा भारताने कॅनडाच्या आरोपांचं खंडन केलं होतं.

हे ही वाचा >> सुनीता विल्यम्स यांनी अंतराळातून दिल्या दिवाळीच्या शुभेच्छा; वडिलांची आठवण काढत म्हणाल्या…

कॅनडा सरकारचे आरोप काय?

रॉयटर्सने दिलेल्या वृत्तानुसार, मंगळवारी कॅनडा सरकारने आरोप केले की कॅनडामधील शीख फुटीरतावाद्यांना लक्ष्य करण्याच्या प्रकरणात अमित शाह यांचाही सहभाग आहे. शीख फुटीरतावाद्यांविरोधातील हिंसक घटनांमागे शाह यांचा हात असल्याचं कॅनडाने म्हटलं आहे. सर्वप्रथम वॉशिंग्टन पोस्टने एक वृत्त प्रसिद्ध केलं होतं की कॅनडा सरकारचे आरोप आहेत की शीख फुटीरतावाद्यांविरोधात कॅनडात झालेल्या हिंसाचाराच्या प्रकरणांमध्ये अमित शाह यांचाही सहभाग आहे.

हे ही वाचा >> भारत-चीन सीमावाद : देप्सांग आणि देम्चोक भागातून सैन्य मागे प्रक्रिया पूर्ण; भारतीय सैनिकांना पूर्वीप्रमाणे गस्त घालता येणार

कॅनडाचे उप परराष्ट्रमंत्री डेव्हिड मॉरिसन नेमकं काय म्हणाले?

रॉयटर्सच्या वृत्तानुसार कॅनडाचे उप परराष्ट्रमंत्री डेव्हिड मॉरिसन यांनी संसदीय समितीला सांगितलं की शीख फुटीरतावाद्यांविरोधातील हिंसेमागे अमित शाह आहेत. मॉरिसन संसदीय समितीसमोर म्हणाले, “एका पत्रकाराने मला विचारलं की त्या हिंसाचारामागे असणारी व्यक्ती म्हणजे अमित शाह आहेत का? त्यावर मी पुष्टी केली की हो तीच व्यक्ती त्या सर्व घटनांमागे आहे”. विशेष म्हणजे यावेळी देखील कॅनडाने भारतावर नुसते आरोप केले आहेत, मात्र कुठल्याही प्रकारचा पुरावा दिलेला नाही.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Amit shah canada alleges indian minister plot to kill sikh separatists asc