पीटीआय, मंडला (मध्य प्रदेश)
मध्य प्रदेश हे राज्य काँग्रेसच्या राजवटीत ‘बिमारु’ राज्य होते, ते भाजपची सत्ता असताना ‘बेमिसाल’ झाले आहे असा दावा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मंगळवारी मंडला येथील जाहीर सभेत बोलताना केला. काँग्रेसने केवळ अल्पसंख्याकांच्या तुष्टीकरणाचे राजकारण केले असा आरोप शहा यांनी केला. मात्र, याउलट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आदिवासी, दलित आणि गरीबांच्या कल्याणावर लक्ष केंद्रित केले असे शहा म्हणाले.
मध्य प्रदेशात या वर्षांच्या अखेरीस विधानसभा निवडणूक होत आहे. त्यासाठी राज्यात भाजपतर्फे ‘जन आशीर्वाद यात्रा’ काढल्या जात आहेत. महाकौशल प्रांतातील मंडला येथे जन आशीर्वाद यात्रेची सुरुवात झाली. त्यासाठी अमित शहा आणि मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान हे उपस्थित होते. अमित शहा यांनी मध्य प्रदेशच्या निवडणुकीवर विशेष लक्ष केंद्रित केले असून, राज्याच्या २३० जागांपैकी १५० जागा जिंकण्याचे पक्षाचे उद्दिष्ट आहे.
हेही वाचा >>>जी-२०च्या यशासाठी एकत्रित प्रयत्नांना तयार; चीनचे स्पष्टीकरण
नरेंद्र मोदी २०१४ मध्ये पंतप्रधान होईपर्यंत देशामध्ये मोठय़ा प्रमाणात अल्पसंख्यांकांचे तुष्टीकरण केले जात होते असा आरोप शहा यांनी केला. त्यानतर ही परिस्थिती बदलली, सत्तेवर आल्यावर मोदी यांनी आदिवासी, दलित, मागासवर्गीय आणि गरीब जनतेच्या कल्याणावर विशेष लक्ष दिले असे ते म्हणाले. आता तुम्हाला दोन विचारसरणींपैकी एकाची निवड करायची आहे असे आवाहन शहा यांनी केले.
हेही वाचा >>>दहशतवाद्याचा छुपा अड्डा सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
काँग्रेस पक्ष आदिवासींच्या जल, जंगल आणि जमिनीवरील अधिकाराची केवळ चर्चा करतो. प्रत्यक्षात त्यांना हे अधिकार भाजपनेच दिले असा दावा शहा यांनी केला. डॉ. मनमोहन सिंह पंतप्रधान असताना आदिवासींसाठी २००४ ते २०१४ या कालावधीत केवळ २४ हजार कोटींचा निधी देण्यात आला होता, तो आता १ लाख १९ हजार कोटी इतका वाढल्याचे शहा यांनी सांगितले.