दिल्ली विधानसभा निवडणुका जिंकण्यासाठी किरण बेदी यांना ‘आयात’ केल्याच्या वृत्ताचा भाजपने शनिवारी स्पष्ट इन्कार केला. भाजपबद्दलची भूमिका सौम्य करावी, असे बेदी यांनी ‘इंडिया अगेन्स्ट करप्शन’च्या नेत्यांना सांगितल्याच्या वृत्तामुळे निर्माण झालेला वादही शमविण्याचा भाजपने प्रयत्न केला.
समाजाच्या विविध स्तरांतील माननीय व्यक्तींना पक्षात प्रवेश देण्यास भाजप अनुकूल असून किरण बेदी हे त्याचेच एक उदाहरण आहे, असे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी म्हटले आहे.किरण बेदी यांनी ‘इंडिया अगेन्स्ट करप्शन’च्या नेत्यांना भाजपबाबतची भूमिका सौम्य करण्यास सांगितल्याने वाद निर्माण झाला असल्याबद्दल शहा यांना विचारले असता ते म्हणाले की, ‘इंडिया अगेन्स्ट करप्शन’ म्हणजे आम आदमी पार्टी नाही.
माध्यमांवर टीका
दिल्लीत आम आदमी पार्टीला विजय मिळावा यासाठी एक हिंदी खासगी वाहिनी कार्यरत असून या वाहिनीविरुद्ध सावध राहण्याचा इशारा अमित शहा यांनी दिला. पीत पत्रकारितेचे याहून मोठे उदाहरण देता येणार नाही, असेही शहा म्हणाले. जनतेने कोणत्या वाहिनीचे कार्यक्रम पाहावे, हे ठरविणारे तुम्ही कोण, असा सवाल वाहिन्यांच्या काही वार्ताहरांनी विचारला असता शहा म्हणाले की, आपण आपले मत व्यक्त केले, ते स्वीकारावयाचे की नाही याचा निर्णय जनतेने घ्यावा.