मोदींच्या कौतुकासाठी स्पर्धा लागली..

लष्करी कारवाईचे महासंचालक लेफ्टनंट जनरल रणबीरसिंग यांनी सीमापार घुसून दहशतवाद्यांचा खात्मा केल्याच्या कारवाईची (सर्जिकल स्ट्राइक्स) घोषणा केली आणि ‘११, अशोका रोड’ या भाजपच्या मुख्यालयामध्ये वातावरण एकदम पालटले. ‘नरेंद्र मोदी सरकारही काही करत नसल्याची’ निराश भावना एका क्षणात कुठल्या कुठे पळून गेली आणि त्याची जागा ‘असे फक्त मोदीच करू शकतात’, या विश्वसाने पुन्हा घेतली. मोदींवर स्तुतिसुमने उधळण्यासाठी मंत्री आणि नेत्यांमध्ये जणू काही स्पर्धाच लागली होती..

‘‘आम्ही सांगत होतो, यावेळी मोदी गप्प बसणार नाहीत. तसेच झाले. १९७१च्या युद्धानंतर भारताचे जवान प्रथमच नियंत्रण रेषा ओलांडून पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसले. या साहसाचे महत्त्व लक्षात घ्या,’’ अशी टिप्पणी राष्ट्रीय उपाध्यक्षाने केली. ‘उत्तर प्रदेशच्या निवडणुकीत याचा फायदा झालाच तर कोणाला नको आहे?,’ असे तो डोळे मिचकावत म्हणाला..

दाताच्या बदल्यात जबडा फोडण्याची आक्रमक भूमिका घेणारे राष्ट्रीय सरचिटणीस राम माधव यांचा चेहरा तर अधिकच फुलला होता. ‘१८ जवानांचे बलिदान वाया जाऊ  देणार नसल्याचे पंतप्रधानांचे शब्द पोकळ नव्हते. जनतेला दिलेला शब्द त्यांनी खरा करून दाखविला आहे. यामुळे भारत व पाकिस्तान संबंधांना लक्षणीय वळण मिळणार असून सीमापार होत असलेल्या कारवायांकडे डोळेझाक केली जाणार नसल्याचा स्पष्ट संदेश मोदींनी दिला आहे. अण्वस्त्रांची धमकी पाकिस्तानने देऊ  नये,’ असे माधव पुन्हा म्हणाले.

भाजपचे अध्यक्ष अमित शहांनी तर मोदी आणि लष्कराचे खास अभिनंदनच केले. दुसरीकडे केंद्रीय मंत्री आणि नेत्यांकडून मोदींवर कौतुकाचा नुसता वर्षांव चालला होता. माहिती प्रसारण मंत्री व्यंकय्या नायडू म्हणाले, ‘पाकने आता धडा घ्यावा आणि छुप्या कारवाया सोडाव्यात. नाही तर त्यांचे काही खरे नाही.’ मोदींच्या हातात देश सुरक्षित असल्याची भावना जनतेमध्ये निर्माण झाल्याचे मत मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी व्यक्त केले. गृहराज्यमंत्री हंसराज अहीर तर म्हणाले, ‘‘अशा निडर पंतप्रधानांच्या मंत्रिमंडळात असण्याचे सद्भाग्य मला लाभले आहे. आपला संयम जगाला माहीत होताच; पण आपण आता साहसही दाखवून दिले आहे.’’

रॅम्बोकारवाईचे अर्थ आणि परिणाम

  • पठाणकोट आणि उरी हल्लय़ाने धक्का बसलेली प्रतिष्ठा आणि प्रतिमा मोदींनी पुन्हा सावरली. ५६ इंची छातीवरून उडविली जाणारी टर कदाचित थांबू शकेल.. थोडक्यात ‘ब्रँड मोदी’ची पडझड रोखण्यात सफल.
  • ‘यूपीए’ व ‘एनडीए’मध्ये आणि डॉ. मनमोहनसिंग व मोदीमध्ये गुणात्मक फरक असल्याचे दाखवून देण्यात यश
  • ‘मोदीच करू शकतात,’ अशी खात्री ‘भक्तां’मध्ये आणि ‘मोदी काहीही करू शकतात’, अशी जरब पाकच्या मनात निर्माण करण्यात यशस्वी.
  • अमेरिका व अन्य महाशक्तींच्या दडपणाला भीक घालत नसल्याचा संदेश देण्याचा प्रयत्न.
  • देशांतर्गंत अनेक प्रश्नांवरून लक्ष वळविण्यात आणि विरोधकांच्या हातातून अनेक मुद्दे हिसकाविण्यात यश.
  • उत्तर प्रदेशातील निवडणुकीत फायदा करून घेण्याचे मनसुबे. त्यामुळे ५६ इंचाचे गोडवे उत्तर प्रदेशात पुन्हा गायले गेले नाही तर नवलच.

 

उद्धव ठाकरेंकडून  मोदींचे अभिनंदन

मुंबई : अतिरेक्यांच्या कारवाया आणि पाकिस्तानबाबत केंद्र सरकारच्या भूमिकेवरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ‘लक्ष्य’ करणाऱ्या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज भारतीय लष्कराच्या अभिमानास्पद कारवाईबद्दल मोदी यांचे दूरध्वनीवरुन अभिनंदन केले. पाकिस्तानमध्ये घुसून केलेल्या कारवाईतून सडेतोड उत्तर दिले गेल्याने शिवसेनेने पंतप्रधान मोदी व केंद्र सरकारची प्रशंसा केली आहे.

 

प्रतिक्रिया

  • भारताने केलेली कारवाई हा पाकिस्तानला दिलेला कठोर संदेश आहे. सीमेपलीकडून होणाऱ्या दहशतवादी हल्ल्यांची संपूर्ण जबाबदारी पाकिस्तानचीच होती. त्यांनी केलेल्या कारवायांना भारताने चोख प्रत्युत्तर दिले आहे. दहशतवादाविरोधातील लढाईत सरकारला काँग्रेसचा संपूर्ण पाठिंबा आहे. – सोनिया गांधी, काँग्रेस अध्यक्षा
  • लष्कराने केलेल्या कारवाईमुळे जम्मू-काश्मीरलगतच्या प्रत्यक्ष नियंत्रण सीमारेषेवर नजीकच्या भविष्यात आणखी काही हल्ले होऊ शकतात. त्यामुळे काश्मिरातील परिस्थिती चिघळू शकते. त्यामुळे येत्या काळात आणखी काळजी घ्यायला हवी. – मेहबूबा मुफ्ती, जम्मू-काश्मीरच्या मुख्यमंत्री
  • कोणत्याही भ्याड हल्ल्यापुढे भारत मान तुकवणार नाही, किंबहुना त्यास तोडीस तोड उत्तर देण्यात येईल, हेच आजच्या कारवाईतून स्पष्ट झाले आहे. सीमेपलीकडे पोसण्यात येणारे दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करण्याच्या कृतीतून एका नव्या भारताचा उदय झाल्याचा संदेश जगाला देण्यात आला आहे. – अमित शहा, भाजप अध्यक्ष
  • पाकव्याप्त काश्मिरात आपल्या जवानांनी गाजवलेल्या मर्दुमकीने अभिमानाने ऊर भरून आला आहे. संपूर्ण देश तुमच्या पाठिशी आहे. असेच लढत राहा. – माजी संरक्षणमंत्री शरद पवारांचे ट्वीट
  • लष्कर आणि सरकारचेही अभिनंदन. आता मागे हटता कामा नये. लाहोर आणि कराचीत जाऊन तिरंगा फडकवण्याची क्षमता आपल्या लष्करात आहे. – संजय राऊत, शिवसेना खासदार
  • आपण आपली पाठ थोपटवून घेण्याची जास्त गरज नाही. पाकिस्तान या कारवाईचा बदला घेऊ शकतो त्यामुळे आपण अधिक सतर्क राहायला हवे. या कारवाईतून पाकिस्तानला कठोर संदेश दिला गेला हे बरेच झाले. आपल्या संयमाला पाकिस्तान दुबळेपणा समजत होता, त्यास प्रत्युत्तर मिळाले. – पालम राजू, माजी केंद्रीय मंत्री

Story img Loader