भाजप अध्यक्ष अमित शहा यांचे ममता बॅनर्जी यांना आव्हान
तृणमूल काँग्रेसचे जे नेते लाच स्वीकारताना फितीत दिसत आहेत त्यांना पक्षातून काढून टाकण्याची हिंमत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी दाखवावी, असे आव्हान मंगळवारी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी दिले.
शारदा चिट फंड घोटाळ्यात भाजप आणि तृणमूल काँग्रेस यांच्यात मॅचफिक्सिंग झाल्याच्या आरोपाचे शहा यांनी जोरदार खंडन केले. पश्चिम बंगाल सरकारने स्थापन केलेल्या विशेष तपास पथकाने गोंधळ घातला असल्याने सीबीआयच्या तपासाला विलंब होत आहे, असेही शहा म्हणाले.
भ्रष्टाचाराविरोधात लढण्याचा निर्धार ममता यांनी यापूर्वी व्यक्त केला आहे. त्यामुळे पक्षाचे जे नेते लाच स्वीकारताना फितीत दिसत आहेत त्यांची हकालपट्टी करावी. आपल्या पक्षाचे नेते निष्पाप असल्याची ममता यांना खात्री आहे तर त्या सीबीआयला नरडा स्टिंग ऑपरेशनची चौकशी करण्याची विनंती का करीत नाहीत, असा सवाल शहा यांनी केला आहे.
नरडाप्रकरणी मॅचफिक्सिंगचा आरोप फेटाळताना शहा म्हणाले की, माध्यमांतील काही जण भाजप काय करीत आहे, असा सवाल करीत आहेत. भाजप काय करणार, फितीत दिसणारे नेते तृणमूलचे आहेत, ममता यांनी त्यांना पक्षातून काढून टाकावे, असे शहा म्हणाले.
लोकसभेत आमच्या पक्षाकडे बहुमत असल्याने हे प्रकरण नीतिमत्ता समितीकडे पाठविले, मात्र राज्यसभेत आमच्याकडे बहुमत नाही, ज्यांच्याकडे बहुमत आहे ते हे प्रकरण नीतिमत्ता समितीकडे का पाठवत नाहीत, असा सवालही अमित शहा यांनी यावेळी केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ममता बॅनर्जीनी शहांना खडसावले
रामचंद्रपूर : पश्चिम बंगालमधील बॉम्बस्फोटांमुळे रवींद्र संगीताचा आवाज दडपला गेला आहे, या भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी केलेल्या टीकेवर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. पश्चिम बंगालचा अपमान करणाऱ्याचा आपल्यापेक्षा अन्य कोणीही मोठा शत्रू नसेल, असे ममतांनी पुरुलिया जिल्ह्य़ातील एका जाहीर सभेत खडसावले. दिल्लीत भाजप आजमितीला सत्तेवर आहे, मात्र उद्या तुमचा पराजय होणार आहे. शहा यांनी रवींद्रनाथ यांच्याबद्दल काहीतरी वक्तव्य केल्याचे आपल्या ऐकिवात आहे. परंतु रवींद्रनाथ टागोर आणि नझरूल इस्लाम यांचा अपमान करणाऱ्यांना बंगालची जनता कधीही माफ करणार नाही, असे ममता बॅनर्जी म्हणाल्या. तृणमूलच्या राजवटीत राज्यात गेल्या पाच वर्षांत केवळ एकच उद्योग विस्तारला आणि तो म्हणजे बॉम्ब तयार करण्याचा उद्योग, या बॉम्बस्फोटांमुळे रवींद्र संगीताचा आवाज दडपला गेला आहे, असे शहा यांनी कोलकाता येथे एका पत्रकार परिषदेत सांगितले.