केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना १३ दिवसांनंतर रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. करोनावर मात केल्यानंतर प्रकृतीच्या कारणास्तव अमित शाह दिल्लीमधील एम्स रुग्णालयात दाखल झाले होते. २ ऑगस्ट रोजी अमित शाह यांना करोनाची लागण झाली असल्याचं समोर आलं होतं. शनिवारी रुग्णालयाने अमित शाह उपचारानंतर पूर्णपणे बरे झाले असल्याचं सांगितलं होतं. तसंच त्यांना लवकरच डिस्चार्ज दिला जाईल अशी माहिती दिली होती. त्यानुसार अमित शाह यांना सोमवारी सकाळी ७ वाजता डिस्चार्ज देण्यात आला.

अमित शाह यांना २ ऑगस्ट रोजी करोनाची लागण झाली होती. अमित शाह यांनीच स्वत: ट्विट करत ही माहिती दिली होती. करोनाची प्राथमिक लक्षणं दिसत असल्याने चाचणी केली असता आपला रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याचं अमित शाह यांनी सांगितलं होतं. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार अमित शाह मेदांता रुग्णालयात दाखल झाले होते. यावेळी अमित शाह यांनी संपर्कात आलेल्यांना स्वत:चं विलगीकरण तसंच चाचणी करण्याची विनंती केली होती. त्यानंतर १४ ऑगस्ट रोजी त्यांनी आपली करोना चाचणी निगेटिव्ह आल्याची माहिती दिली होती. तसंच डॉक्टरांनी दिलेल्या सल्ल्यानुसार पुढचे काही दिवस मी स्वतःला होम क्वारंटाइन करणार असल्याचं शाह यांनी सांगितलं होतं.

दरम्यान भारतात रविवारी आतापर्यंतच्या सर्वाधिक ७८ हजार ७६१ करोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. भारतातील रुग्णसंख्येने ३५ लाखांचा टप्पा ओलांडला आहे. देशात आतापर्यंत ६४ हजार रुग्णांचा मृत्यू झाला आहे.