सोहराबुद्दीन शेख आणि तुलसीराम प्रजापती बनावट चकमक प्रकरणात सीबीआयच्या विशेष न्यायालयाने मंगळवारी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांना दिलासा दिला. न्यायालयाने या प्रकरणात अमित शहा निर्दोष असल्याचा निकाल दिला. आपल्याला या प्रकरणी गोवण्यात आल्याचे सांगत शहा यांनी स्वत:ला आरोपमुक्त करण्यासाठी न्यायालयाकडे विनंती अर्ज सादर केला होता. २००५ मध्ये गुजरात पोलिसांच्या दहशतवादी विरोधी पथकाने लष्कर-ए-तोयबाचा अतिरेकी असलेल्या सोहराबुद्दिन आणि त्याची पत्नी कौसर बी यांचे अपहरण करून त्यांची हत्या केल्याचा आरोप गुजरात पोलिसांवर आहे. या प्रकरणातील मुख्य साक्षीदार असणाऱ्या तुलसीराम प्रजापतीलाही पोलिसांनी २००६ मध्ये चकमकीत मारले होते. त्यानंतर सीबीआयने केलेल्या तपासात अमित शहा यांच्यावर मुख्य आरोपी म्हणून ठपका ठेवण्यात आला होता. त्यांना २०१०मध्ये याप्रकरणी अटकही करण्यात आली होती. मात्र, तीन महिने कारागृहात राहिल्यानंतर त्यांची जामीनावर सुटका करण्यात आली होती. दरम्यान, या निकालाविरोधात उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचे सोहराबुद्दीनच्या कुटुंबियांनी सांगितले.