भाजपाच्या सायबर सैनिकांना पक्षाध्यक्ष अमित शाहनी काही महत्त्वाच्या टिप्स दिल्या असून सगळ्यात आधी प्रत्येकानं गृपाठ करावा असा सल्ला त्यांनी दिला आहे. भाजपाच्या यशामध्ये सोशल मीडियाचा वाटा निर्विवाद असून भाजपाला पाठिंबा देणारी सायबर आर्मी मोठ्या प्रमाणावर आहे हे उघड गुपित आहे. भाजपाचा प्रचार करायचा नी विरोधकांना ट्रोल करायचं ही भाजपाच्या सायबर सेलची स्ट्रॅटेजी असल्याचं सांगितलं जातं. उडुपीमध्ये सोशल मीडिया कॉनक्लेवमध्ये सहभागी होत अमित शाह यांनीही सोशल मीडियाचं निवडणुका जिंकण्यासाठी असलेलं महत्त्व अधोरेखीत केलं आहे.
कर्नाटकात निवडणुका होऊ घातल्या असून काँग्रेसकडून सत्ता ताब्यात घेण्यास भाजपा प्रयत्नशील आहे. त्यादृष्टीने सोशल मीडियातल्या आपल्या सायबर सैनिकांशी शाह यांनी बुधवारी संवाद साधला आणि त्यांना महत्त्वाच्या टिप्स दिल्या. नरेंद्र मोदी सरकारच्या कल्याणकारी योजना मांडत रहायचं आणि कर्नाटक सरकारवर सर्व शक्तिनं तुटून पडण्याचा सल्ला त्यांनी भाजपाच्या सायबर सैनिकांना दिला आहे.
मोदी सरकारच्या योजना कुठल्या असा प्रश्न विचारला असता 112 योजनांपैकी 15 योजनादेखील उपस्थितांना सांगता आल्या नाहीत. त्यामुळे चिंतित झालेल्या शाह यांनी या योजनांची माहिती तुम्हालाच नसेल तर लोकांना काय सांगणार असा सवाल विचारत आधी गृहपाठ करा असा सल्ला दिला.
सोशल मीडियाचा वापर महत्त्वाचा असल्याचे सांगताना विशेषत: कर्नाटकात भाजपा विरोधात असल्यामुळे सोशल मीडियाचा वापर प्रभावी करता येईल असे शाह म्हणाले.
केंद्र सरकारच्या विविध योजनांचा अभ्यास करायचा, त्यांचे वर्गीकरण करायचं आणि त्यांचा योग्य त्या प्रेक्षकांपर्यंत पोचेपर्यंत मारा करायचा असं धोरण शाह यांनी आखून दिलं आहे. निरव मोदी, विजय मल्ल्या व महादायीसारख्या मुद्यांवर काय प्रतिक्रिया द्यायची असं विचारलं असता शाह म्हणाले की आक्रमक भूमिका घेत तुटून पडायचं नी अजिबात मवाळ व्हायचं नाही. निरव मोदीप्रकरणावर मी बोललोय नी महादायी प्रकरणी सत्तेत आल्यावर येडियुरप्पा बोलतील असं अमित शाह म्हणाले. परंतु काही झालं तरी या मुद्यांवर बचावातमक राहण्याची काही आवश्यकता नसल्याचा कानमंत्र शाहनी सायबर सैनिकांना दिला आहे.
काँग्रेस सरकार पाच वर्ष सत्तेत आहे, त्यांच्यावर प्रश्नांचा भडीमार करा त्यांच्यावर हल्ला चढवा असा सल्ला शाह यांनी दिला आहे. सायबर सैनिकांच्या दोन टीम असाव्यात, एक टीम कंटेट तयार करेल आणि दुसरी टीम तिचा अत्यंत वेगाने प्रसार करेल अशी रचना करण्याचा सल्ला शाहनी दिला आहे. त्यामुळे आता कर्नाटक विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सोशल मीडियावर बघायला मिळेल यात काही शंका नाही.