नवी दिल्ली : संसदेतील धक्काबुकीची घटना तसेच, डॉ. आंबेडकरांच्या मुद्द्यावरून काँग्रेसने उठवलेले रान अशा संवेदनशील मुद्द्यांच्या पार्श्वभूमीवर बुधवारी राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या (एनडीए) घटक पक्षांच्या नेत्यांची महत्त्वपूर्ण बैठक भाजपचे पक्षाध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या निवासस्थानी झाली. यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा देखील उपस्थित होते. काँग्रेसच्या नकारात्मक विचारांना प्रत्युत्तर देण्याची गरज नसल्याचे शहांनी सांगितल्याची माहिती निषाद पक्षाचे अध्यक्ष संजय निषाद यांनी दिली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

संविधान, आंबेडकर आदी मुद्द्यांवरून काँग्रेस केंद्र सरकारचे लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे ‘एनडीए’च्या नेत्यांनी काँग्रेसच्या आरोप-प्रत्यारोपापासून दूर राहिले पाहिजे, असा सल्ला शहांनी बैठकीत दिला. पुढील पाच वर्षांच्या काळात सरकारची सकारात्मक धोरणे आणि उपक्रम राबवण्यावर अधिक लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे, असेही शहांनी नेत्यांना सांगितले.

हेही वाचा >>> Man Sets Himself On Fire : शेजाऱ्यांचे भांडण पोहचले दिल्लीत, उत्तर प्रदेशच्या तरुणाने संसद भवनासमोर घेतले पेटवून

माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या जन्मशताब्दीनिमित्त (२५ डिसेंबर) ही बैठक आयोजित करण्यात आली होती. वाजपेयींच्या नेतृत्वाखाली ‘एनडीए’चे पहिले सरकार केंद्रात सत्तेवर आले होते. सुशासन हा वाजपेयी सरकारचा प्रमुख विषय होता. आता मोदींच्या नेतृत्वाखालील ‘एनडीए’चे सलग तिसरा सरकारचा कार्यकाळ यशस्वी करण्यासाठी देखील सुशासन हाच प्रमुख मुद्दा असेल. या बैठकीची नेमकी विषयपत्रिका स्पष्ट करण्यात आली नसला तरी, ‘एनडीए’मध्ये समन्वय व सुप्रशासनावर अधिक भर यादृष्टीने चर्चा झाल्याचे समजते.

या बैठकीला ‘तेलगु देसम’चे अध्यक्ष व आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू, जनता दल (सं)चे नेते राजीव रंजन सिंह, अपना दलच्या (एस) अध्यक्ष अनुप्रिया पटेल, जनता दल (ध) नेते एच. डी. कुमारस्वामी, हिंदुस्थानी आवाम मोर्चा (एस) नेते जीतन राम मांझी, राष्ट्रीय लोक मोर्चाचे अध्यक्ष उपेंद्र कुशवाह आदी नेते उपस्थित होते.

दिल्ली, बिहारकडे लक्ष

पुढील वर्षी फेब्रुवारीमध्ये दिल्लीमध्ये व त्यानंतर बिहारमध्ये विधानसभेची निवडणूक होत आहे. या निवडणुकांमध्ये आंबेडकर, संविधान, जातनिहाय जनगणना, आरक्षण आदी विषयांवर काँग्रेसकडून भर दिला जाण्याची शक्यता आहे. हे लक्षात घेऊन ‘एनएडीए’ची रणनीती आखली जात आहे. त्याअनुषंगानेही बैठकीमध्ये चर्चा झाल्याचे समजते.

राष्ट्रवादीचे नेते अनुपस्थित

राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) गटाकडून कोणीही उपस्थित नव्हते. शिवसेनेकडून (शिंदे) केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव हे उपस्थित होते.

आम्ही भविष्यातही एकत्रितपणे रणनीती आखून पुढे जाऊ. हरियाणा व महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणुकीतील विजय मिळवला. आता जनतेला दिलेली आश्वासने पूर्ण करण्यासाठी काम करावे लागणार आहे. त्या दृष्टीनेही बैठकीमध्ये चर्चा झाली. – संजय निषाद, निषाद पक्षाचे अध्यक्ष

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Amit shah in nda leaders meeting need to counter congress on ambedkar issue zws