पीटीआय, नवी दिल्ली
‘सार्क व्हिसा’ अंतर्गत भारतात आलेल्या सर्व पाकिस्तानी नागरिकांना शोधून मुदत संपण्यापूर्वी त्यांची मायदेशी रवानगी करावी, अशी सूचना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शुक्रवारी सर्व राज्यांना केली. त्यांनी प्रत्येक राज्याच्या मुख्यमंत्र्याला व्यक्तिगतरीत्या दूरध्वनी केला.
पहलगाम हल्ल्याचे धागेदोरे पाकिस्तानपर्यंत पोहोचल्यानंतर केंद्राने सार्क सवलतींतर्गत व्हिसावर भारतात आलेल्यांना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश दिले आहेत. यासंदर्भात गुरुवारी पाकिस्तानला सूचित केल्यानंतर गुरुवारी शहा यांनी प्रत्येक मुख्यमंत्र्याला स्वतंत्र दूरध्वनी करून याबाबतचा सूचना केल्या. आपापल्या राज्यात राहणाऱ्या पाकिस्तानी नागरिकांची माहिती जमा करा आणि त्यांची मायदेशी पाठवणी होईल, हे बघा असे शहा यांनी सांगितले. त्यानंतर लगेचच केंद्रीय गृहसचिव गोविंद मोहन यांनी सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्य सचिवांनाही यासंदर्भात आदेश दिल्याची माहिती सूत्रांनी दिली. पाकिस्तानातून आलेल्या हिंदूंना दिले गेलेले दीर्घ मुदतीचे व्हिसा रद्द करण्यात आले नसल्याचे केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे.
जलशक्ती मंत्रालयाची खलबते
भारताने सिंधू जलकरारास स्थगिती दिल्यानंतर कार्यवाही करण्यासाठी गुरुवारी जलशक्ती मंत्रालयाची महत्त्वाची बैठक झाली. गृहमंत्री अमित शहा यांनी बोलाविलेल्या या बैठकीला जलशक्ती मंत्री सी. आर. पाटील आणि मंत्रालयातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
राज्याची यादी तयार फडणवीस
महाराष्ट्रात राहणाऱ्या पाकिस्तानी नागरिकांची यादी तयार असून सर्व पोलीस स्थानकांना त्यांची रवानगी करण्याबाबत सूचना दिल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले. आपण स्वत: सर्व कारवाईवर लक्ष ठेवून असल्याचेही त्यांनी सांगितले. मुदतीनंतर एखादा पाकिस्तानी नागरिक अवैधरित्या राहात असल्याचे आढळून आले, तर त्याच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.
पहलगामचा दहशतवादी हल्ला ही एक भयानक दुर्घटना आहे. जम्मू आणि काश्मीरमधील संपूर्ण जनतेने या भ्याड हल्ल्याचा निषेध केला आहे. त्यांनी देशाला पूर्ण पाठिंबा दिला आहे. कुटुंबातील सदस्य गमावलेल्या प्रत्येकाबद्दल माझे प्रेम, आपुलकी.– राहुल गांधी,विरोधी पक्षनेते, लोकसभा