Amit Shah launches bharatpol : भारतीय तपास यंत्रणांचे काम काही प्रमाणात सोपं होणार आहे. कारण केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मंगळवारी भारतपोल नावाचे एक पोर्टल लाँच केलं आहे. या पोर्टलच्या माध्यमातून माध्यमातून गुन्हेगारांचा शोध घेण्यासाठी आंतरराष्ट्रीय तपास यंत्रणांकडून जलद मदत घेणे सोपे होणार आहे. या पोर्टलच्या लाँचवेळी अमित शाह यांनी भारतीय तपास यंत्रणांनी फरार गुन्हेगारांना पकडण्यासाठी अधुनिक तंत्रज्ञान वापरण्याची वेळ आली असल्याचे मत व्यक्त केले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

दिल्ली येथील भारत मंडपम येथे भारतपोलचे लॉन्च करण्यात आले, यावेळी बोलताना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी रिअल टाइम इंटरफेस हे केंद्रीय अन्वेषण ब्यूरो (सीबीआय) ने विकसित केलेल्या पोर्टलचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. ज्याच्या मदतीने केंद्र आणि राज्यातील यंत्रणांना इंटरपोलशी सहज संपर्क साधता येईल. यामुळे त्यांच्या तपासाला गती मिळेल असेही मत व्यक्त केले.

“गुन्हा करून भारतातून फरार झालेल्यांना पकडण्यासाठी आणि त्यांना न्यायापर्यंत पोहोचवण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान आणि तंत्रांचा वापर करण्याची वेळ आली आहे,” असे अमित शाह यावेळी म्हणाले.

“आपण वैश्विक आव्हानांवर लक्ष्य दिले पाहिजे आणि आपल्या अंतर्गत यंत्रणा अपडेट केल्या पाहिजेत. भारतपोल हे त्या दिशेने टाकलेले एक पाऊल आहे”, असेही शाह म्हणाले. या पोर्टलमुळे केंद्रीय आणि राज्य तपास यंत्रणांना इंटरपोलच्या १९५ सदस्य राष्ट्रांबरोबर संबंधित प्रकरणांची माहिती शेअर करता येईल. तसेच या देशांकडून आवश्यक ती माहिती जलद मिळवता येईल. मोदी सरकारने गेल्या वर्षी तीन नवीन फौजदारी कायदे लागू केले आहेत, यांच्या मदतीने फरार गुन्हेगारांवर अधिक चांगल्या पद्धतीने खटले चालवले जातील.

हेही वाचा>> ठरलं! दिल्ली विधानसभेची निवडणूक ५ फेब्रुवारीला आणि निकाल ८ फेब्रुवारीला; निवडणूक आयुक्तांची घोषणा

भारतपोल पोर्टल काय आहे

गृहमंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार सायबर गुन्हे, आर्थिक गुन्हे, ऑनलाईन कट्टरता, संघटीत गुन्हेगारी, अंमली पदार्थांची तस्करी आणि वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर गुन्ह्यांच्या तपासासाठी जलद आणि रियल टाइम आंतरराष्ट्रीय मदतीची आवश्यकता आहे. त्यानुळे सीबीआयने भारतपोल पोर्टल विकसित केले आहे, जे सीबीआयच्या अधिकृत वेबसाइटच्या माध्यमातून उपलब्ध होईल.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Amit shah launches bharatpol to connect with interpol to help with investigations marathi news rak