Amit Shah on K Annamalai & AIADMK Alliance : तमिळनाडूमधील जुने मित्र भारतीय जनता पार्टी व ऑल इंडिया अण्णा द्रविड मुन्नेत्र कळघम हे दोन पक्ष पुन्हा एकदा एकत्र आले आहेत. तत्पूर्वी भाजपाने के. अण्णामलाई यांना भाजपाच्या प्रदेशाध्यपदावरून हटवल्याचं वृत्त समोर आलं आहे. त्यांच्या जागी तिरुनेलवेलीचे आमदार नैयनार नागेंद्रन यांची प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती केली जाणार असल्याचा दावा अनेक प्रसारमाध्यमांनी केला आहे.

भाजपा व अण्णाद्रमुकच्या युतीमुळेच के. अण्णामलाई यांना त्यांचं पद गमवावं लागलं अशी राजकीय वर्तुळात चर्चा ऐकायला मिळत आहे. दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री तथा भाजपाचे वरिष्ठ नेते अमित शाह यांनी पत्रकार परिषदेत यावर भाष्य केलं आहे.

अण्णामलाई यांच्या हकालपट्टीबाबत शाह काय म्हणाले?

अण्णामलाई यांच्या हकालपट्टीबद्दल प्रश्न विचारल्यावर अमित शाह म्हणाले, हे वृत्त चुकीचं आहे. शेजारी बसलेल्या अण्णामलाई यांच्याकडे इशारा करत शाह म्हणाले, “ते आजही आमचे अध्यक्ष आहेत. म्हणूनच ते इथे माझ्याबरोबर बसले आहेत.”

अमित शाहांकडून भाजपा व एआयएडीएमकेच्या युतीची घोषणा

दरम्यान, अमित शाह यांनी भाजपा व एआयएडीएमकेच्या युतीची घोषणा केली आणि ते म्हणाले, “दोन्ही पक्ष आगामी तमिळनाडू विधानसभा निवडणूक एकत्र मिळून लढतील. दोन्ही पक्षांनी तमिळनाडूची निवडणूक एनडीएच्या छताखाली एकत्र येऊन लढण्याचा निर्णय घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली आम्ही आगामी निवडणुकांना सामोरे जाऊ.” इडापल्ली पलानीस्वामी यांच्या नेतृत्वाखाली अण्णाद्रमुक पक्ष विधानसभा निवडणूक लढवणार आहे.

अमित शाह काय म्हणाले?

अमित शाह यावेळी दोन्ही पक्षांच्या मैत्रीवर प्रकाश टाकत म्हणाले दोन्ही पक्ष १९९८ पासून एनडीएचा भाग आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी व दिवंगत जयललिता या दोघांनी बरीच वर्षे राष्ट्रीय राजकारणात एकत्र काम केलं आहे. आमच्या युतीने एकेकाळी राज्यातील ३९ पैकी ३० जागा जिंकल्या होत्या. यावेळी देखील आम्हाला आशा आहे की आमची युती पुन्हा एकदा तीच किमया करून दाखवेल आणि एनडीएला राज्यात प्रचंड बहुमताचं सरकार स्थापन करण्याची संधी मिळेल.

अण्णामलाई यांच्यामुळे युती तुटली होती?

सप्टेंबर २०२३ मध्ये भाजपाचे तमिळनाडू अध्यक्ष के. अण्णामलाई यांच्या एका वक्तव्यामुळे मोठा वाद झाला होता. या वादातून दोन पक्षांची युती देखील तुटली होती. अण्णामलाई यांनी एका मुलाखतीत आणि नंतर समाजमाध्यमांवरील पोस्टद्वारे एआयएडीएमकेचे संस्थापक एम. जी. रामचंद्रन (एमजीआर) आणि तमिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जे. जयललिता यांच्या धोरणांवर टीका केली होती.