केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपा नेते अमित शाह दोन दिवसीय पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर आहेत. सिलीगुडी येथील रेल्वे स्पोर्ट्स ग्राऊंडवर सभेला संबोधित करताना त्यांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर जोरदार निशाणा साधला. “बंगालच्या जनतेने सीएम ममता बॅनर्जी यांना तिसऱ्यांदा जनादेश दिला, आम्हाला वाटले की दीदी बऱ्या होतील. पण, दीदींच्या राजवटीत भ्रष्टाचार, सिंडिकेट आणि भाजपा कार्यकर्त्यांच्या हत्या थांबलेल्या नाहीत. ममता दीदींनी असा विचार करू नये की भाजपा प्रत्युत्तर देणार नाही.” त्यानंतर अमित शाह यांनी सीएए बद्दलही आपलं मत स्पष्ट केलं. ” टीएमसी सीएए बद्दल अफवा पसरवत आहे की त्याची अंमलबजावणी होणार नाही, परंतु मी सांगू इच्छितो की कोविड १९ ची लाट ओसरताच आम्ही CAA लागू करू. ममता दीदींना घुसखोरी हवी आहे, पण CAA कायदा आहे आणि राहील.”
दुसरीकडे हरिदासपूरमध्ये झालेल्या जाहीर सभेत अमित शाह यांनी देशाची सुरक्षा ही सरकारची प्राथमिकता असल्याचे सांगितले. देशाची अंतर्गत आणि बाह्य सुरक्षा अभेद्य करणे हे मोदी सरकारचे मूळ उद्दिष्ट असल्याचे मंत्री अमित शाह यांनी सांगितलं. “आम्ही आमच्या सैनिकांना सीमेवरील सुरक्षेसाठी जगातील सर्वात प्रगत तंत्रज्ञान उपलब्ध करून देण्याचे काम करत आहोत. आज सतलज, कावेरी आणि नर्मदा फ्लोटिंग बीओपी राष्ट्राला समर्पित आहेत.” असंही त्यांनी सांगितलं. “देशभरात जेव्हा जेव्हा एखादी घटना घडते तेव्हा त्या शिष्टमंडळ पाठवतात, मात्र त्यांनी बीरभूमला शिष्टमंडळ का पाठवले नाही, जिथे ८ महिला आणि एका मुलाला जिवंत जाळण्यात आले, ते त्यांचे लोक नाहीत का?” असा सवालही गृहमंत्री अमित शाह यांनी विचारला.
सीएए कायदा २०१९ मध्ये लागू करण्यात आला होता. परंतु अद्याप अंमलात आणला गेला नाही. हिंदू, शीख, बौद्ध, जैन, पारसी आणि ख्रिश्चन समुदायाच्या सदस्यांना नागरिकत्व देण्याचे या कायद्याचं उद्दिष्ट आहे. सीएए कायदा १२ डिसेंबर २०१९ रोजी अधिसूचित करण्यात आला आणि १० जानेवारी २०२० रोजी अंमलात आला. अफगाणिस्तान, बांगलादेश आणि पाकिस्तानमधून आलेल्या हिंदू, शीख, बौद्ध, जैन, पारशी आणि ख्रिश्चन समुदायातील स्थलांतरितांना नागरिकत्व प्रदान करणे हे त्याचे उद्दिष्ट आहे. ३१ डिसेंबर २०१४ रोजी किंवा त्यापूर्वी भारतात असलेल्या नागरिकांसाठी हा कायदा आहे. शाह पुढील तीन आठवड्यांत सात राज्यांचा दौरा करणार आहेत. या दरम्यान ते सार्वजनिक, राजकीय आणि अधिकृत कार्यक्रमांना उपस्थित राहतील. शाह हे सध्या पश्चिम बंगालमध्ये दोन दिवसांच्या दौऱ्यावर आहेत. त्यानंतर आसाम, तेलंगणा, केरळ, उत्तराखंड, अरुणाचल प्रदेश, महाराष्ट्र आणि गुजरातचा दौरा करणार आहेत.