Jammu Kashmir Terror Attack : जम्मू-काश्मीरमधील पहलगाममध्ये २२ एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात तब्बल २६ पर्यटकांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर संपूर्ण देशभरातून संतप्त प्रतिक्रिया उमटल्या आहेत. या घटनेच्या पार्श्वभूमीवर भारताने पाकिस्तानवर अनेक निर्बंध लादले आहेत. सध्या पाकिस्तान आणि भारतामध्ये तणावाचं वातावरण निर्माण झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. तसेच भारतीय जवानांकडून दहशतवाद विरोधी मोहिम राबवण्यात येत आहे.

दरम्यान, केंद्रीय गृहमंत्रालयाने आता एक मोठा निर्णय घेतला आहे. गृहमंत्री अमित शाह यांनी आज (२५ एप्रिल) सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्‍यांबरोबर संवाद साधत पहलगाममध्ये २२ एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर चर्चा केली. तसेच यावेळी गृहमंत्री अमित शाह यांनी सर्व राज्याच्या मुख्यमंत्र्यांना महत्वाचे निर्देश दिले आहेत. ‘पाकिस्तानी नागरिकांना शोधा आणि तात्काळ परत पाठवा’, अशा सूचना अमित शाह यांनी सर्व राज्याच्या मुख्यमंत्र्यांना दिल्या आहेत. या संदर्भातील वृत्त इंडिया टुडेनी दिलं आहे.

भारताने पाकिस्तानी नागरिकांसाठी असलेले सर्व व्हिसा सेवा तात्काळ बंद करण्याचा निर्णय घेतला २४ एप्रिल रोजी घेतला होता. त्यानंतर आता केंद्रीय गृहमंत्रालयाने मोठा निर्णय घेत पाकिस्तानशी संबंधित सर्व व्हिसा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. या संदर्भातील आदेश गृहमंत्रालयाकडून जारी करण्यात आल्याचं वृत्तात म्हटलं आहे. गृहमंत्री अमित शाह यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांबरोबर झालेल्या बैठकीनंतर हा निर्णय घेतला आहे.

भारताने कोणते मोठे निर्णय घेतलेले आहेत?

जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर मोदी सरकारने कठोर पाऊल उचलत पाच मोठे निर्णय घेतले आहेत. १९६० चा सिंधू पाणी करार तात्काळ प्रभावाने स्थगित करण्यात येत आहे. जोपर्यंत पाकिस्तान दहशतवादाला खतपाणी घालत राहील तोपर्यंत हा करार स्थगित राहील. तसेच संयुक्त चेकपोस्ट अटारी तात्काळ प्रभावाने बंद करण्यात येत आहे. ज्यांनी वैध मार्गाने अटारी सीमा ओलांडली आहे, ते १ मे २०२५ पूर्वी त्या मार्गाने परत येऊ शकतात. पाकिस्तानी नागरिकांना सार्क व्हिसा सवलत योजनेअंतर्गत भारतात प्रवास करण्याची परवानगी रद्द करण्यात आली आहे. यापूर्वी पाकिस्तानी नागरिकांना जारी केलेले व्हिसा रद्द मानले जातील. एसव्हीईएस व्हिसाद्वारे सध्या भारतात असलेल्या सर्व पाकिस्तानी नागरिकांनी तत्काळ भारत सोडावा. यासाठी त्यांना ४८ तासांची मुदत आहे. नवी दिल्लीतील पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील संरक्षण, लष्करी, नौदल आणि हवाई अधिकाऱ्यांनी एका आठवड्यात भारत सोडावा. भारताने इस्लामाबादमधील भारतीय उच्चायुक्तालयातून स्वतःचे संरक्षण, नौदल आणि हवाई सल्लागारांना माघारी बोलवण्याचा निर्णय घेतला आहे.