पवार यांच्या घराण्यात सध्या निवडणूक लढवण्यावरून असलेले वाद व त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची घसरण यामुळेच ते सध्या चुकीची माहिती पसरवत आहेत, असा आरोप भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी केला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अलीकडेच असे विधान केले आहे की, राफेल कराराशी मतभेद असल्यानेच दिवंगत मनोहर र्पीकर यांनी संरक्षण मंत्री पद सोडले होते. त्यावर शहा यांनी असे ट्विट केले आहे की, माजी संरक्षण मंत्री असताना पवारसाहेब तुमच्याकडून अशा वक्तव्याची अपेक्षा नव्हती, तुमच्या पक्षाची परिस्थिती घसरत चालली आहे. कुटुंबात निवडणुका लढवण्यावरून वाद आहेत. कदाचित त्यामुळे आलेल्या नैराश्यातून असे विधान तुम्ही केले असेल हे आम्ही समजू शकतो.

तुम्ही काँग्रेस का सोडलीत व नंतर काय केले याचा विचार करा, असे शहा यांनी म्हटले आहे. पवार यांनी १९९९ मध्ये सोनिया गांधी या विदेशी वंशाच्या असल्याने त्यांनी पक्षाचे नेतृत्व करणे योग्य नाही या मुद्दय़ावर काँग्रेस पक्षाला रामराम ठोकला होता. त्यासंदर्भात शहा यांनी ही टिप्पणी केली आहे. पवार यांनी नंतर राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना करून पुन्हा महाराष्ट्रात काँग्रेसशी हातमिळवणी केली होती.

अलीकडेच पवार यांनी असे म्हटले होते की, र्पीकर यांचे राफेल कराराबाबत मतभेद होते त्यामुळे ते संरक्षण मंत्रिपद सोडून गोव्यात परत आले होते. गेल्या महिन्यात निधन झालेल्या र्पीकर यांनी असे म्हटले होते की, त्यांना गोव्यात काम करण्यास आवडेल. त्यानंतर २०१७ च्या विधानसभा निवडणुकीनंतर ते गोव्यात मुख्यमंत्री म्हणून परतले होते.