जयपूर : जगात कुठल्याही नेत्याची दहशतवादविरोधी राजकीय इच्छाशक्ती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याएवढी नाही, त्यामुळे केंद्रातील भाजप सरकार जवानांचे बलिदान वाया जाऊ देणार नाही, असे भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी येथे जाहीर सभेत  सांगितले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पुलवामा हल्ल्यात १४ फेब्रुवारीला केंद्रीय राखीव पोलिस दलाचे ४० जवान शहीद झाले होते, त्याचा उल्लेख करून ते म्हणाले, की आता लष्कर याला सडेतोड उत्तर देईल, या देशात मोदीच देशाच्या गरजेस अनुसरून मजबूत सरकार देऊ शकतात.

स्वातंत्र्यानंतर मोदी सरकारने सर्वात जास्त संरक्षण खर्च अर्थसंकल्पात मंजूर केला आहे. लष्कराचे आधुनिकीकरण करून ते मजबूत करण्याचे भाजपचे प्रयत्न आहेत. भाजप सरकारने दहशतवाद्यांना ठोस प्रत्युत्तर दिले असून त्यात यशही मिळवले आहे. सगळा देश शहिदांच्या पाठीशी आहे. मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकार जवानांचे बलिदान वाया जाऊ देणार नाही. लष्कर आताच्या हल्ल्यासही सडेतोड उत्तर देईल. भाजप दहशतवाद सहन करणार नाही.

दहशतवादविरोधात मोदी यांच्या इतकी प्रबळ राजकीय इच्छाशक्ती जगातील दुसऱ्या कोणत्याही देशाच्या नेत्यात नाही. देशाला मजबूत सरकार हवे व ते मोदी यांच्याशिवाय कुणी देऊ शकत नाही.  विरोधी आघाडीकडे नेताच नाही, त्यांचे दलालच सरकार चालवतील व नेते दूर राहतील.

राहुल गांधी यांनी विरोधी आघाडीचा नेता कोण याचे उत्तर द्यावे असे सांगून ते म्हणाले, की ही महाआघाडी ‘मोदी हटाव’चा नारा देत आहे. भाजपची सरकारे १६ राज्यांत आहेत, नवीन राज्यात पक्षाचा विस्तार झाला आहे. भाजपने उत्तर व ईशान्य भाग जिंकला आहे. आता पश्चिम बंगाल व ओडिशात आम्ही भाजपचा झेंडा फडकवणार आहोत.

आम्ही पराभवाने निराश झालो नाही व विजयाने उन्मत्त बनलो नाही. त्यामुळेच देशाची सेवा करू शकलो. २०१९ च्या निवडणुका महत्त्वाच्या आहेत कारण एकीकडे आम्हाला गरिबांसाठी काम करायचे आहे. दुसरीकडे सत्ता मिळवायची आहे. ऑगस्टा वेस्टलँड प्रकरणातील दलाल ख्रिस्तीयन मिशेल याच्या प्रत्यार्पणानंतर त्याची चौकशी झाली आहे. त्यामुळे काँग्रेसचे नैराश्य वाढले आहे. त्या प्रकरणातील सर्व आरोपी कोठडीत आहेत. त्यामुळे दहा वर्षांत १२ लाख कोटींचा भ्रष्टाचार करणारा काँग्रेस पक्ष कुठल्या तोंडाने लोकांसमोर जाणार असा प्रश्न आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Amit shah pulwama terror attack bjp government