आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्या शपथविधी दरम्यान घडलेल्या एका कृतीचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला. या व्हिडिओमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शाह तामिळनाडूचे भाजपा नेते आणि तेलंगणाच्या माजी राज्यपाल तमिलिसाई सौंदरराजन यांच्याबरोबर रागाने बोलताना दिसले. अमित शाह अशाच पद्धतीने निर्मला सीतारमण यांच्याबरोबर बोलले असते का? असा सवाल समाज माध्यमातून विचारण्यात आला. या व्हिडिओतील अमित शाहांच्या रागामुळे त्यांच्यावर चौफेर टीका झाली. परंतु, याबाबत आता खुद्द तिमिलिसाई सुंदरराजन यांनी खुलासा केला आहे.

सुंदरराजन यांनी एक्स पोस्टमध्ये म्हटलं की, “काल, जेव्हा मी २०२४ च्या निवडणुकीनंतर आंध्र प्रदेशमध्ये आमचे माननीय गृहमंत्री अमित शाहांना भेटले, तेव्हा त्यांनी निवडणुकीनंतरच्या कृती आणि माझ्यासमोर असलेल्या आव्हानांबद्दल विचारले. त्यावर मी स्पष्टीकरण देत होते. वेळेच्या कमतरतेमुळे अत्यंत काळजीने राजकीय आणि मतदारसंघातील काम जोमाने पार पाडण्याचा सल्ला त्यांनी दिला, जो दिलासा देणारा होता. या व्हिडिओवरून सुरू असलेल्या चर्चांना पूर्णविराम देण्याकरता ही पोस्ट लिहिली आहे.”

हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी अमित शाहांना प्रश्न विचारले होते. अमित शाहांवर टीका होत होती. माजी केंद्रीय मंत्री दयानिधी मारन यांनीही या व्हिडीओवरून अमित शाह यांना सुनावलं. “हीच वागणूक तुम्ही निर्मला सीतारमण यांनाही दिली असती का?” असा प्रश्र त्यांनी अमित शाह यांना विचारला. दयानिधी मारन यांनी परिपत्रक जारी करत अमित शाह यांच्यावर टीका केली. अमित शाह तमिलिसाई सौंदरराजन यांच्याशी ज्या पद्धतीने वागले, ते अतिशय दुर्दैवी आहे. हा व्हिडीओ बघून अतिशय वाईट वाटलं. त्या तेलंगणाच्या माजी राज्यपाल आहेत, असे दयानिधी मारन म्हणाले. पुढे बोलताना, हीच वागणूक अमित शाह यांनी निर्मला सीतारमण किंवा एस जयशंकर यांना दिली असती का? असा प्रश्नही त्यांनी विचारला. याशिवाय तमिलिसाई सौंदरराजन या फक्त तामिळनाडूमधून येत असल्यानेच अमित शाहांनी त्यांना अशाप्रकारे वागणूक दिली, असा आरोपही त्यांनी केला.

हेही वाचा >> “हीच वागणूक तुम्ही निर्मला सीतारमण यांनाही दिली असती का?” ‘त्या’ व्हिडीओवरून माजी केंद्रीय मंत्र्याने अमित शाहांना सुनावलं!

नेमकं प्रकरण काय?

बुधवारी (१२ जून रोजी) तेलगू देसम पक्षाचे प्रमुख चंद्राबाबू नायडू यांनी आंध्रप्रदेशच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. या शपथविधी सोहळ्याला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासह भाजपाचे वरिष्ठ नेते उपस्थित होते. या सोहळ्यादरम्यान अमित शाह माजी राज्यपाल तमिलिसाई सौंदरराजन यांच्यावर कथितरित्या संतापल्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता.

नेमकं काय घडलं?

शपथविधी सोहळ्यादरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे व्यासपीठावर बसले असताना त्यावेळी माजी राज्यपाल तमिलिसाई सौंदरराजनदेखील तिथे पोहोचल्या. त्यांनी माजी उपराष्ट्रपती वैंकया नायडू आणि अमित शाह यांना अभिवादन केलं. त्या पुढे जाणार इतक्याच अमित शाह यांनी त्यांना बोलवून त्यांच्याशी चर्चा केली. यावेळी अमित शाह तमिलिसाई सौंदरराजन यांना रागात काही तरी सांगत असल्याचे दिसून आलं.

भाजपा राज्य सोशल मीडिया सेलचे उपाध्यक्ष कार्तिक गोपीनाथ यांनी एक्स या समाज माध्यमावर हा व्हिडीओ शेअर केला होता. ‘अमित शाह तमिलिसाई अक्का यांना कडक चेतावणी देत आहेत, असं वाटतं. पण सार्वजनिक इशारा देण्याचे कारण काय असू शकते?’ असं कॅप्शन त्यांनी या व्हिडीओला दिलं होता.

विशेष म्हणजे मागील काही दिवसापासून तमिलिसाई सौंदरराजन आणि तामिळनाडूचे राज्यप्रमुख अन्नामलाई यांच्या समर्थकांमध्ये वाद सुरू असल्याचे सांगितले जात असताना हा व्हिडीओ व्हायरल झाला. त्यामुळे सोशल मीडियावरही विविध चर्चांनाही उधाण आलं. दरम्यान, या व्हिडीओबाबत भाजपाकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.