राज्यसभेत शिवसेना ( ठाकरे गट ) खासदार संजय राऊत आणि गृहमंत्री अमित शाह यांच्यामध्ये जुपल्याचं पाहायला मिळालं. परदेशातला गौरव मोदींचा नाहीतर भारताच्या पंतप्रधानांचा आहे, असं संजय राऊत यांनी बोलताना म्हटलं. यावर अमित शाह यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. जरा तुम्हीही पंतप्रधानांना सन्मान देत चला, असं टोला अमित शाहांनी संजय राऊतांना लगावला आहे.
दिल्ली सेवा विधेयकावर बोलताना संजय राऊत म्हणाले, “दिल्लीत जनतेनं निवडलेलं सरकार आले आहे. लोकांनी नायब राज्यपालांना निवडून दिलं नाही. केजरीवाल किंवा अन्य नेते मत मागतात. दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीत भाजपाचा ६ वेळा पराभव झाला आहे. दिल्ली विधानसभेत भाजपाचे ५ आमदार नाहीत. दिल्ली, महाराष्ट्र, तामिळनाडू, पश्चिम बंगालवर तुम्ही ताबा मिळवू पाहत आहात.”
“दिल्लीच्या निवडणुकीत भाजपाचा पराभव झाला आहे. २०२४ सालीही तुमचा पराभव होत ‘इंडिया’ आघाडी जिंकणार आहे. पंतप्रधानांना सगळ्यांनी विश्वगुरु बनवलं आहे. पण, बायडेन यांच्यापासून फ्रान्सच्या राष्ट्रपतीपर्यंत मोदींची गळाभेट घेतात. ते नरेंद्र मोदी यांची गळाभेट घेत नाहीतर, महान लोकशाही असलेल्या देशाच्या पंतप्रधानांची गळाभेट घेऊन गौरव करतात. तुम्ही ती परंपरा संपवण्याचं काम करत आहात,” असा हल्लाबोल संजय राऊत यांनी भाजपावर केला.
हेही वाचा : “पंतप्रधान तिथे बसून…”, दिल्ली सेवा विधेयक मंजुरीवर केजरीवालांची पहिली प्रतिक्रिया!
यावर अमित शाह यांनी म्हटलं, “संजय राऊत म्हणतात, ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी परदेशात गेल्यावर त्यांचा गौरव केला जातो. कोण त्यांचा ऑटोग्राफ घेतो, तर कोणी वाकून नमस्कार करतो, कोण बॉस म्हणतो. तो पंतप्रधान मोदींचा नाहीतर देशाचा गौरव आहे.’ पण, आमच्या मनात असे कुठेही नाही की, तो पंतप्रधान मोदींचा व्यक्तिगत गौरव आहे. हा नरेंद्र मोदी नावाच्या पंतप्रधान असलेल्या देशाचा गौरव आहे.”
हेही वाचा : नव्वदीतले मनमोहन सिंग व्हीलचेअरवर राज्यसभेत हजर! मोदींशी तुलना करत काँग्रेस म्हणते…
“एवढ्या सगळ्या देशाचे पंतप्रधान, राष्ट्रपती भारताच्या पंतप्रधानांचा सन्मान करतात. हे पाहून तुम्हीही पंतप्रधानांना सन्मान द्यायला चालू करा,” असा टोलाही अमित शाहांनी संजय राऊतांना लगावला आहे.