मणिपूरमध्ये गेल्या अडीच महिन्यांपासून सुरू असलेल्या हिंसाचारामुळे संपूर्ण देशातून संतापाची लाट उसळली आहे. यावर आता लोकसभा आणि राज्यसभेतलं वातावरणही तापलं आहे. संसदेच्या पावसाळी अधिवेशनात विरोधी पक्षांनी लोकसभा आणि राज्य सभेतही मणिपूरप्रश्नी चर्चेची मागणी केली. प्रामुख्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याविषयी लोकसभेत बोलावं, अशी मागणी विरोधी पक्षांनी केली. परंतु गेल्या अडीच महिन्यांपासून मणिपूर धगधगत असलं तरी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याप्रकरणी लोकसभेत मौन बाळगलं आहे.

गेल्या ८० दिवसांत पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूर प्रकरणावर केवळ एकदाच बोलले आहेत. गेल्या आठवड्यात संसदेबाहेर येऊन त्यांनी त्यांचं मत व्यक्त केलं होतं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या विषयावर लोकसभेत बोलावं, अशी मागणी विरोधकांनी केली असता आज लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी गृहमंत्री अमित शाह यांना याविषयी बोलण्याची विनंती केली. ओम बिर्ला म्हणाले, विरोधी पक्ष गेल्या दोन-तीन दिवसांपासून मणिपूरविषयी चर्चेची मागणी करत आहेत. आज गृहमंत्री येथे उपस्थित आहेत. त्यामुळे मी गृहमंत्र्यांना विनंती करतो की, त्यांनी या विषयावर बोलावं.

अमित शाह म्हणाले, विरोधी पक्षातील सर्व सदस्यांनी आग्रह केला आहे की, मणिपूरसारख्या एका संवेदनशील मुद्द्यावर चर्चा व्हायला हवी. सदनातील सदस्यांनी, मग ते सत्ताधारी पक्षातील असतील अथवा विरोधी पक्षांमधील, अनेक खासदारांनी याविषयी चर्चेची मागणी केली आहे. मी सदनात या विषयावर चर्चा करण्यासाठी तयार आहे. परंतु, मला कळत नाही की, विरोधी पक्ष यावर चर्चा का करू देत नाहीत. विरोधी पक्षांच्या सर्व नेत्यांना माझी विनंती आहे की, त्यांनी या विषयावर चर्चा होऊ द्यावी. या संवेदनशील विषयाचं संपूर्ण सत्य देशासमोर आलं पाहिजे. हे खूप महत्त्वाचं आहे.

लोकसभेत यावेळी विरोधी पक्ष मागणी करत होते की, मणिपूरप्रश्नी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बोलावं. यावेळी विरोधी बाकावरील खासदारांनी गोंधळ घातला.

हे ही वाचा >> Manipur Violence : TMC नेत्याचा सभापतींशी वाद, आप खासदारावर मोठी कारवाई, नेमकं काय घडलं?

या प्रकरणावर राज्यसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे म्हणाले, आम्हीसुद्धा चर्चेसाठी तयार आहोत. परंतु यावर पंतप्रधानांनी त्यांचं म्हणणं मांडावं. जर १४० कोटी जनतेचा नेता बाहेर पत्रकारांशी बोलत असेल आणि १४० कोटी जनतेचे प्रतिनिधी सदनात बसलेले असतील तर तुम्ही इथंही तुमचं मत मांडावं.

Story img Loader