बुधवारी लोकसभेचं कामकाज सुरू असताना काही तरूणांनी संसदेत आणि संसदेच्या बाहेर गोंधळ घातला. लोकसभेच्या मुख्य सभागृहात दोन घुसखोरांनी धुराच्या नळकांड्या फोडल्या. त्याचवेळी संसदभवन परिसरात दोघांनी घोषणाबाजी करत धुराच्या नळकांड्या फोडल्या. यावरून विरोधकांनी संसदेत निदर्शन करत गोंधळ घातला आहे. याप्रकरणी लोकसभेतील १३ आणि राज्यसभेमधील १ खासदाराला निलंबित करण्यात आलं आहे. अशातच गृहमंत्री अमित शाह यांनी विरोधकांना सुनावलं आहे.

‘अजेंडा आजतक २०२३’ या कार्यक्रमात बोलताना अमित शाह म्हणाले, “संसदेत घडलेली घटना गंभीर आहे. यावरून विरोधक राजकारण करत आहेत. अर्थात ही एक चूक झाली आहे. मात्र, संसदेची सुरक्षा अध्यक्षांच्या अंतर्गत येते, हे सर्वांना माहिती आहे. अध्यक्षांनी गृहमंत्रालयाला पत्रही लिहिलं आहे. यासाठी आम्ही चौकशी समिती स्थापन केली असून, लवकरच अहवाल अध्यक्षांकडे पाठवला जाईल.”

“लोकसभेची सुरक्षा वाढवण्यात येत आहे. सुरक्षेतील त्रूटी भरून काढण्याची जबाबदारी आमची आहे. विरोधकांनी याला राजकीय मुद्दा बनवू नये,” असं अमित शाहांनी सुनावलं आहे.

हेही वाचा :  इंजिनिअर ते ई रिक्षाचालक कोण कोण आहेत संसदेत घुसखोरी करणारे आरोपी?

दरम्यान, सभागृहाच्या कामकाजात अडथळ आणल्याबद्दल १४ खासदारांना हिवाळी अधिवेशनाच्या उर्वरित कालावधीसाठी निलंबित करण्यात आलं आहे. यात लोकसभेतील १३ आणि राज्यसभेतील १ खासदाराचा समावेश आहे. १४ खासदारांमध्ये लोकसभेमधील ९ काँग्रेसचे, २ सीपीएम, १ डीएमके, १ सीपीआय आणि राज्यसभेतील १ तृणमूल काँग्रेसचा आहे.

हेही वाचा :  “…म्हणून मी त्या तरुणांना प्रेक्षक गॅलरीचे व्हिजिटर पास दिले”, भाजपा खासदाराचं स्पष्टीकरण

या खासदारांच्या निलंबनाचा प्रस्ताव संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी आणला होता. तो लोकसभा अध्यक्षांच्या खुर्चीवर बसलेल्या भर्तृहरी महाताब यांनी मंजूर केला. हिवाळी अधिवेशनाच्या उर्वरित दिवसांसाठी या खासदारांना निलंबित करण्यात आलं. विरोधी पक्षाचे खासदार संसदेच्या सुरक्षेवरून सतत घोषणाबाजी करताना दिसत होते. त्यानंतर खासदारांना निलंबित करण्याचा निर्णय घेण्यात आला.

Story img Loader