सत्तेसाठी कॉंग्रेससोबत हातमिळवणी करून बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी समाजवादी नेते जयप्रकाश नारायण आणि कर्पुरी ठाकूर यांचे स्वप्न धुळीस मिळवले असल्याची घणाघाती टीका भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी गुरुवारी पाटण्यात केली. बिहारमध्ये होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर थेट नितीशकुमार यांच्यावर हल्ला चढवत अमित शहा यांनी प्रचाराचे एकप्रकारे बिगुलच वाजवले.
बिहारमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या परिवर्तन रथयात्रेचा शुभारंभानिमित्त पाटण्यातील ऐतिहासिक गांधी मैदानावर अमित शहा यांची सभा झाली. ते म्हणाले, जॉर्ज फर्नांडिस आणि जितन राम मांझी यांच्यासोबत नितीशकुमारांनी काय केले, हे सर्वांनाच माहिती आहे. लालूप्रसाद यादव यांच्या पक्षासोबत आघाडी करून नितीशकुमार यांनी २०१० च्या निवडणुकीत बिहारी जनतेने दिलेल्या कौलाचा विश्वासघात केला आहे, असाही टोला त्यांनी लगावला.
या सभेवेळी केंद्रीय मंत्री आणि लोकजनशक्ती पक्षाचे नेते रामविलास पासवान, बिहारचे माजी मुख्यमंत्री जितन राम मांझी, राष्ट्रीय लोक समता पक्षाचे नेते आणि केंद्रीय मंत्री उपेंद्र कुशवाह, केंद्रीय मंत्री अनंत कुमार यांच्यासह राज्यातील भाजपचे वरिष्ठ नेते व्यासपीठावर उपस्थित होते.

Story img Loader