मणिपूरचा मुद्दा पुढे करत विरोधी पक्षांनी मोदी सरकार विरोधात अविश्वास प्रस्ताव आणला आहे. त्यावर मंगळवारपासून लोकसभेत चर्चा सुरु झाली आहे. राहुल गांधी, स्मृती इराणी यांच्यासह इतर खासदारांची भाषणं झाल्यानंतर गृहमंत्री अमित शाह यांनी या सगळ्यावर भाष्य केलं आहे. एवढंच नाही तर विरोधकांनी अविश्वास प्रस्ताव का आणला जातो ती कारणंही सांगितली.
काय म्हणाले अमित शाह?
देश स्वतंत्र झाला आहे त्यानंतर सदनात आत्तापर्यंत २७ वेळा अविस्वास प्रस्ताव आणि ११ वेळा विश्वास प्रस्ताव या सदनासमोर आले. अनेकदा सरकारचं बहुमत गेल्यानंतर किंवा ते डळमळीत असल्यानंतर विरोधी पक्ष अविश्वास प्रस्ताव आणत असतात. तर काही वेळा मोठमोठ्या जनआंदोलनाच्या वेळी जनतेच्या भावना समजाव्यात म्हणून असा प्रस्ताव आणला जातो. मी आज त्यांना (विरोधकांना) सांगू इच्छितो जर सरकार विरोधात अविश्वास प्रस्ताव आणत आहात तर जी चर्चा होते आहे त्यात सरकार विरोधी मुद्दे तर ठेवायचे होते.
माझं भाषण सगळ्यांनी नीट ऐकावं
सगळ्यांना माझी विनंती आहे की माझं भाषण नीट ऐकावं. कारण आमच्या सरकारविरोधात आणलेला हा अविश्वास प्रस्ताव हा एक चुकीची धारणा तयार करण्यासाठी आणण्यात आला आहे. जनतेच्या इच्छेचं प्रतिबिंब या अविश्वास प्रस्तावात कुठेच दिसत नाही. आमच्याकडे अल्पमत असण्याचा काही प्रश्नच येत नाही. कारण अविश्वास प्रस्तावाच्या विरोधात जे जे बोलले आहेत त्यांनी पाठिंबा दिला आहे हे लोकसभेने पाहिलंच आहे. जनतेलाही हा विश्वास आहे की देशात ६० कोटी गरीबांच्या आयुष्यात आशा निर्माण झाली की आपलं आता काही भलं होऊ शकतं. पंतप्रधान नरेंद्र मोदींमुळे या गोष्टी घडल्या आहेत असंही अमित शाह यांनी म्हटलं आहे.
अविश्वासाची झलकही दिसत नाही
मी देशभरात फिरत असतो. जनतेशी आम्ही संवादही केला आहे. अविश्वास दाखवणं सोडा त्याची झलकही आम्हाला दिसत नाही. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर दीर्घ काळाने जनतेचा ज्या सरकारवर विश्वास आहे असं सरकार म्हणजे मोदी सरकार आहे. नरेंद्र मोदी सरकारला दोन तृतीयांश बहुमत देऊन जनतेने निवडून दिलं. देशात ३० वर्षांनी संपूर्ण बहुमताचं सरकार बसलं आहे. तसंच स्वातंत्र्यानंतर जर कुणी लोकप्रिय पंतप्रधान असतील तर ते पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत असंही अमित शाह यांनी म्हटलं आहे. घराणेशाही क्विट इंडिया, भ्रष्टाचार क्विट इंडिया, तुष्टीकरण क्विट इंडिया हे नारेही अमित शाह यांनी दिले.