Amit Shah Slam Manish Sisodia Delhi Election 2025 : दिल्ली विधानसभा निवडणुकीला काही तास शिल्लक असताना राजकीय वर्तुळात आरोप प्रत्यारोपांना उत आला आहे. यादरम्यान भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आम आदमी पक्षाचे नेते मनीष सिसोदिया यांच्यावर टीका केली आहे. दिल्लीचे माजी मुख्यमंत्री सिसोदिया यांनी गेल्या १० वर्षांच्या कार्यकाळात काहीही काम केलं नाही आणि त्यांचं लक्ष फक्त शाळा आणि मंदिरांच्या जवळ दारूची दुकाने सुरू करण्यावर होतं अशी टीका शाह यांनी केली आहे. दिल्ली विधानसभा निवडणूक प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अमित शाह जंगपुरा येथे आयोजित सभेत बोलत होते.

अमित शाह यांनी यंदाच्या विधानसभा निवडणुकीत मतदारसंघ बदललेल्या सिसोदिया यांच्यावर जोरदार टीका केली. “आठ तारखेला अरविंद केजरीवाल स्वत: निवडणुकीत पराभूत होत आहेत आणि तुमच्या येथे मनीष सिसोदीया आले आहेत. त्यांना विचारा की तुम्ही असे काय केले ज्यामुळे तुम्हाला पडपडगंज (मतदारसंघ) येथून इकडे यावे लागले? त्यांनी पडपडगंज येथे लोकांना अनेक खोटी आश्वासने दिली, आता त्यांना वाटतं की जंगपुरा येथे जाऊन आपण लोकांना खोटी आश्वासने देऊन फसवू. मनीष सिसोदिया तुम्ही दिल्लीत कुठेही जा, लोक तुम्हाला ओळखतात. १० वर्षांच्या राजकीय कार्यकाळात उपमुख्यमंत्री म्हणून तुम्ही एकच केलं ते म्हणजे गुरूद्वारा, मंदिर आणि शाळा यांच्याजवळ दारूची दुकाने उघडण्याचं काम केलं. देशात एकच शिक्षणमंत्री आहे जो मद्य घोटाळ्यात तुरूंगात गेले”.

आपचे नेते अरविंद केजरीवाल आणि मनिष सिसोदिया यांच्यावर टिका करताना, “हे पडपडगंज येथील लोकांना धोका देऊन आले आहेत. बडे मियाँ छोटे मियाँ जोडीने संपूर्ण दिल्लीला फसवण्याचं काम केलं आहे”, असेही अमित शाह म्हणाले.

अरविंद केजरीवाल यांच्यावरही हल्लाबोल

दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आणि आपचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी यमुना नदीच्या प्रदूषणाबद्दल केलेल्या वक्तव्याबद्दल अमित शाह म्हणाले की, “केजरीवाल म्हणाले होते की ते यमुना नदीत डुबकी घेतील, पण त्यांनी तसे केले नाही.केजरीवाल, तुम्ही यमुना नदी स्वच्छ केली नाही, पण आज मला सांगायचे आहे की आम्ही सत्तेत आल्यानंतर तीन वर्षात नदीवर यमुना रिव्हर फ्रंट उभारू.”

“ज्या राज्यांमध्ये भाजपाचे डबल इंजिन सरकार आहे त्यांनी गेल्या १० वर्षांत प्रगती केली आहे. दिल्ली मागे पडली आहे, ते केंद्राशी सतत भांडत आहेत. गेल्या १० वर्षांपासून ते (आप) कारणे देत आहेत आणि रडक्या बाळांसारखे वागत आहेत,” असेही शाह म्हणाले.

दिल्ली विधानसभा निवडणुकीत विजय मिळवण्यासाठी आप, भाजपा आणि काँग्रेस या तीन बड्या पक्षांमध्ये जोरदार लढत पाहायला मिळत आहे. आपकडून दिल्लीची सत्ता ताब्यात घेण्यासाठी भाजपाने संपूर्ण शक्ती पणाला लावली आहे. तर काँग्रेस देखील दिल्लीत सत्तेत परत येण्यासाठी प्रयत्न करताना दिसत आहे. यादरम्यान येत्या ५ फेब्रुवारी रोजी येथे मतदान होणार आहे. तर ८ फेब्रुवारी रोजी मतमोजणी होणार आहे.

Story img Loader