जागतिक योग दिनाला देशातील मुस्लीम संघटनांनी विरोध दर्शविला असताना भाजप अध्यक्ष अमित शहा यांना चक्क दोन मुस्लीम मुली योगा शिकविणार आहेत. यामुळे योगाविरोधात असणाऱ्या मुस्लीम संघटनांना ‘शह’ देण्याचा शहा यांचा प्रयत्न असल्याचे दिसून येत आहे.
रुक्साना खातून आणि बिस्मिल्ला खातून अशी या मुस्लीम योगगुरूंची नावे असून या दोघी शहांसह केंद्रीय मंत्र्यांनाही २१ जून रोजी होणाऱ्या जागतिक योग दिनासाठी प्रशिक्षण देणार आहेत. याबाबतची माहिती बिहार-झारखंड पतंजली योगपीठाचे प्रमुख अजित कुमार यांनी दिली.
या दोन्ही मुली अल्पवयीन आहेत. त्या पूर्व चंपारण जिल्हय़ातील आहेत. योगामध्ये त्यांनी विशेष प्रावीण्य मिळविले असून ऑस्ट्रिया व दक्षिण आफ्रिकेमधील लहान मुलांच्या स्पर्धेत त्यांनी भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. योगा हे कधीही जातपात, प्रांतामध्ये भेदभाव करत नसल्याचे कुमार यांनी सांगितले.
अमित शहांसह बिहारमधील केंद्रीय मंत्री रवी शंकर प्रसाद, राधा मोहन सिंग, राजीव प्रताप रुडी, राम कृपाल यादव आणि गिरीराज सिंग यांना या दोघी योगाचे धडे देणार आहेत.
योगावरील गैरसमजांवर पुस्तक
जागतिक योगा दिना निमित्ताने मुस्लीम समुदायामध्ये योगाबाबतचे गैरसमजाचे मळभ दूर करण्यासाठी आरएसएसची शाखा असलेल्या मुस्लीम राष्ट्रीय मंचने ‘योगा आणि इस्लाम’ असे पुस्तकाचे काढले आहे.
संरक्षण मंत्रालयाचा परिसर ‘योगामय’
संरक्षण मंत्रालयाचा परिसर ‘योगामय’ बनला असून अनेक अधिकारी योगाचा सराव करताना दिसत आहेत.
सुरक्षेसाठी ‘ऑपरेशन डोगा’
नवी दिल्ली : राजपथावर होणाऱ्या आंतरराष्ट्रीय योगा दिनामध्ये जगभरातून व देशातून जवळपास ४० हजार लोक सहभागी होणार आहेत. एवढय़ा मोठय़ा कार्यक्रमाची सुरक्षा करण्यासाठी यंत्रणा सज्ज करण्यात आली असून, प्रशिक्षित श्वानांचे पथकही तैनात करण्यात येणार आहे. यासाठी या मोहिमेचे नाव ‘डॉग’ आणि ‘योगा’ वरून ‘ओप डोगा’ असे ठेवण्यात आले आहे.
यासाठी इंडो-तिबेटियन सीमा सुरक्षा दलाच्या प्रशिक्षित श्वानांना तैनात करण्यात येणार आहे. या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदींसह जवळपास ४० हजार लोक सहभागी होणार आहेत. आधीच काही मुस्लीम संघटनांनी योगा दिनाला विरोध केल्याने कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सुरक्षा व्यवस्था कडक ठेवण्यात येणार आहे.