लोकसभेच्या निवडणुकांना अद्याप दोन वर्षांचा अवकाश आहे परंतु भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष अमित शहा यांनी पश्चिम बंगालमध्ये आतापासूनच लोकसभेची तयारी सुरू केल्याचे दिसत आहे. अमित शहा हे पश्चिम बंगालच्या तीन दिवसीय दौऱ्यावर आहेत. त्यांच्या या दौऱ्याला विस्तार यात्रा असे नाव देण्यात आले आहे. पुढील २ वर्षांमध्ये भाजपचा विस्तार करुन २०१९ मध्ये जास्तीत जास्त जागा जिंकण्याचे आपले उद्दिष्ट आहे असे शहा यांनी म्हटले. नक्षलबारीतील एका आदिवासी कुटुंबियांच्या घरी जेवण करुन त्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. २०१९ मध्ये पश्चिम बंगालमध्ये कमळ फुलणार असे ते म्हणाले.
West Bengal: BJP president Amit Shah meets locals, party workers at Naxalbari. pic.twitter.com/veZcdWt4WK
— ANI (@ANI) April 25, 2017
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विजयरथ आपण थांबवू असे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना वाटते. परंतु तो त्यांचा भ्रम आहे असे शहा यांनी म्हटले. ममता बॅनर्जी यांच्या काळात हिंसाचार वाढला असल्याचे शहा यांनी म्हटले. ममता बॅनर्जी यांचा कार्यकाळ हा डाव्या सरकारपेक्षाही वाईट असल्याची टीका शहा यांनी केली. पश्चिम बंगालसारख्या राज्याची अवस्था डावे आणि तृणमूल काँग्रेसमुळे बिकट झाली असल्याचे त्यांनी म्हटले. डाव्या सरकारमुळे पश्चिम बंगालची प्रगती होत नाही असे वाटत असे परंतु तृणमूलच्या काळातही ही स्थिती काही सुधारल्याचे दिसत नाही असे त्यांनी म्हटले.
Trinamool netaaon ko kehna chaahta hun, jitna atyachaar karoge, hinsa ka kichad phailaoge, kichad mein kamal aur achhe se khilega: Amit Shah pic.twitter.com/NQKI9e8fM2
— ANI (@ANI) April 25, 2017
पश्चिम बंगाल हे सुधारणावादी राज्य होते परंतु या दोन्ही प्रशासनांच्या काळात कुठलीही सुधारणा झाल्याचे दिसत नाही असे ते म्हणाले. शारदा चिट फंड घोटाळा आणि नारदा स्टिंग ऑपरेशनचा संदर्भ देऊन ते म्हणाले, या राज्याला भ्रष्टाचाराने पोखरले आहे. तृणमूलचे बहुतांश नेते या या घोटाळ्यामध्ये अडकले आहेत आणि ममता बॅनर्जींचे लक्ष केवळ अल्पसंख्यांकाच्या तुष्टीकरणाकडे आहे. पश्चिम बंगालमधील बहुतांश उद्योगधंदे बंद पडत आहेत परंतु हॅंड ग्रेनेड बनविण्याचा उद्योग मात्र जोरात सुरू असल्याचे ते म्हणाले. ममता बॅनर्जी या नोटाबंदीला विरोध करतात परंतु या राज्यातील मालडा येथून येणाऱ्या खोट्या नोटा त्या थांबवू शकत नाहीत असे शहा म्हणाले.