Amit Shah On Waqf Amendment Bill 2025: संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी लोकसभेत वक्फ दुरुस्ती विधेयक मांडले असून, त्यावर आता चर्चा सरू आहे. या दरम्यान रिजिजू यांनी, विरोधी पक्षांकडून लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला जात आहे, असा आरोप केला आहे. तर, ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डने वक्फ दुरुस्ती विधेयकाला तीव्र विरोध केला आहे. याचबरोबर विरोधी पक्षांच्या अनेक नेत्यांनीही याला विरोध केला आहे.
संसदेत वक्फ विधेयकावरील चर्चेदरम्यान, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी पूर्ण ताकदीने त्याचे समर्थन केले. ते म्हणाले, “माझ्या मंत्रीमंडळातील सहकाऱ्याने मांडलेल्या विधेयकाचे मी समर्थन करतो. दुपारी १२ वाजल्यापासून सुरू असलेली चर्चा मी लक्षपूर्वक ऐकत आहे. मला वाटते की अनेक सदस्यांचे खरोखरच किंवा राजकीय कारणांमुळे अनेक गैरसमज आहेत.”
कंकलेश्वर मंदिराची १२ एकर जमीन…
यावेळी बोलताना अमित शाह यांनी महाराष्ट्रातील दोन गावांमधील मंदिरांवर केलेल्या दाव्याचा उल्लेख केला. ते म्हणाले, “महाराष्ट्रातील कोल्हापूरच्या वडणगे गावातील महादेव मंदिरावर वक्फ बोर्डाने दावा केला होता. याचबरोब बीडमधील कंकालेश्वर मंदिराची १२ एकर जमीन वक्फ बोर्डाने जबरदस्तीने ताब्यात घेतली होती.”
ते पुढे म्हणाले की, “२०१३ मध्ये, तुष्टीकरणासाठी वक्फला एका रात्रीत अतिरेकी स्वरूप देण्यात आले. यामुळे, दिल्लीतील १२३ सरकारी मालमत्ता वक्फला देण्यात आल्या. दिल्ली वक्फ बोर्डाने उत्तर रेल्वेची जमीन वक्फच्या नावावर घोषित केली. हिमाचल प्रदेशात, वक्फ मालमत्ता म्हणून घोषित केलेल्या जमिनीवर बेकायदेशीर मशिदी बांधण्यात आल्या. तामिळनाडूमध्ये, १५०० वर्षे जुन्या मंदिराची जमीन वक्फला देण्यात आली.”
शाहांनी सांगितला वक्फ शब्दाचा अर्थ
वक्फचा अर्थ आणि त्याचा इतिहास स्पष्ट करताना गृहमंत्री अमित शहा म्हणाले की, “वक्फ हा एक अरबी शब्द आहे, ज्याचा उल्लेख काही हदीसांमध्ये आहे.” त्यांनी सांगितले की, “वक्फ म्हणजे अल्लाहच्या नावाने मालमत्ता दान करणे आणि त्याची प्रथा इस्लामचे दुसरे खलीफा उमर यांच्या काळात सुरू झाली.”
संसदेत वक्फ विधेयकावरील चर्चेदरम्यान बोलताना गृहमंत्री अमित शहा म्हणाले की, वक्फशी संबंधित धार्मिक कार्यात गैर-मुस्लिमांना समाविष्ट केले जाणार नाही. परंतु, काही लोक या मुद्द्यावर गैरसमज पसरवून आपली मतपेढी सुरक्षित करण्यासाठी राजकारण करत आहेत. त्यांनी स्पष्ट केले की, वक्फ बोर्ड आणि वक्फ कौन्सिलमधील बिगर मुस्लिम सदस्य केवळ काम योग्यरित्या होत आहे की नाही याची खात्री करण्यासाठी असतील.