उत्तर प्रदेशातील सर्वधर्मसमभावाची भावना भारतीय जनता पक्षाचे नेते अमित शाह यांच्यामुळे नेस्तनाबूत होईल, अशी भीती समाजवादी पक्षाचे अध्यक्ष मुलायमसिंह यादव यांनी मंगळवारी व्यक्त केली. समाजात फूट पाडण्याच्या अमित शाह यांच्या राजकारणाविरोधात आपण खंबीरपणे उभे राहणार असल्याचेही यादव यांनी स्पष्ट केले.
लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने पक्षाच्या कार्यालयात पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी आपला प्रमुख प्रतिस्पर्धी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. ते म्हणाले, अमित शाह यांच्यासारखे नेते राजकारणात आहेत आणि त्यांच्याकडे उत्तर प्रदेशाची जबाबदारी दिली आहे, ही अत्यंत दुर्दैवी स्थिती आहे. उत्तर प्रदेश ही रामाची, कृष्णाची, बुद्धाची, जयप्रकाश, लोहिया, अटलबिहारी वाजपेयी यांची भूमी आहे. त्यामुळे अमित शाह यांच्यासारखे नेते या प्रदेशात जे काही काम करीत आहेत, त्याचा आम्ही कायमच विरोध करू. अमित शाह यांचा इतिहास काय आहे, याची माहिती प्रत्येकाने घेतली पाहिजे. ज्यावेळी गुजरातमध्ये दंगल उसळली होती, त्यावेळी हेच शहा त्या राज्याचे गृहमंत्री होते, याकडेही त्यांनी लक्ष वेधले
भाजपचे माजी केंद्रीय राज्यमंत्री अशोक प्रधान आणि पक्षाचे माजी आमदार प्रेमप्रकाश तिवारी यांनी मंगळवारी समाजवादी पक्षात प्रवेश केला. त्या पार्श्वभूमीवर पत्रकार परिषदेत मुलायमसिंह यादव यांनी शाह यांच्यावर टीका केली.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा