गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्या प्रचाराच्या चित्रफितीत आपल्या आवाजाची नक्कल केल्याने अभिनेते अमिताभ बच्चन संतप्त झाले होते. याबाबत कायदेशीर कारवाई करणार असल्याचे त्यांनी सूचित करताच राजकोट येथील संगीतकार उत्पल जिवरजनी याने माफी मागून यूटय़ूबवरून ही चित्रफीत काढून टाकली. या चित्रफितीच्या  निर्मितीशी आपला संबंध नसल्याचा जिवरजनी याने दावा केला.
गुजरात पर्यटनाचे सदिच्छा दूत असलेल्या अमिताभ यांनी २००७ मध्ये ‘लीड इंडिया’ मोहिमेसाठी दिलेला आवाज चोरून ही चित्रफीत तयार करण्यात आली. यूटय़ूबवरील ही चित्रफीत टाकण्यात आली त्यात नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधानपदासाठी अमिताभ समर्थन करत असल्याचे दाखवण्यात आले. आपण २००७ मधील या मोहिमेत जे काही आवाहन केले होते, त्याचा खोडसाळपणे वापर केल्याचे सांगत, इथे त्याचा काय संबंध, असा उद्विग्न सवाल बच्चन यांनी त्यानंतर केला होता.
बच्चन यांनी आक्रमक पवित्रा घेतल्यावर अशी बनावट चित्रफीत तयार करणाऱ्या व्यक्तीने तातडीने अमिताभ यांची माफी मागावी, अशी सूचना नरेंद्र मोदी यांनी केली होती. अखेर राजकोट येथील संगीतकार उत्पल जिवरजनी याने माफी मागितली आहे. आपला ही चित्रफीत तयार करण्याशी काही संबंध नसल्याचे त्याने सांगितले. १५ ऑगस्टला मला ती मिळाली. आपल्याला ही चित्रफीत पाहिल्यावर रंजक वाटली, म्हणून ती यूटय़ूबवर टाकल्याचे मान्य केले. मात्र या घटनेने अमिताभ बच्चनही आणि नरेंद्र मोदीही संतप्त झाले. अखेर या दोघांचीही माफी मागून ती चित्रफीत काढून टाकली.