‘अतुल्य भारत’ प्रचारासाठी सदिच्छादूताची थेट नियुक्ती करण्याचा पर्यटन मंत्रालय विचार करीत आहे. सध्या खासगी एजन्सीमार्फत सदिच्छादूताची नियुक्ती करण्याऐवजी थेट नियुक्ती करण्याचा विचार केला जात आहे. महानायक अमिताभ बच्चन आणि अभिनेत्री प्रियंका चोप्रा यांची सदिच्छादूत म्हणून निवड होण्याची दाट शक्यता आहे.

पर्यटन मंत्रालयानचे एका खासगी एजन्सीसमवेत असलेले कंत्राट संपुष्टात आले आहे. या एजन्सीने सदिच्छादूत म्हणून अभिनेते आमिर खान यांची नियुक्ती केली होती. देशातील असहिष्णुतेबद्दल आमिर खान यांनी केलेल्या वक्तव्यामुळे त्याच्यावर सत्तारूढ भाजपने टीका केली होती.

आता ‘अतुल्य भारत’च्या सदिच्छादूताच्या शर्यतीत अमिताभ बच्चन आणि प्रियंका चोप्रा यांची नावे आघाडीवर आहेत. अमिताभ बच्चन गेल्या काही वर्षांपासून गुजरात पर्यटनाच्या जाहिरातींमध्ये झळकत आहेत.